विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास
By राजेश भोस्तेकर | Published: June 8, 2024 06:52 AM2024-06-08T06:52:05+5:302024-06-08T06:52:44+5:30
तटकरे यांच्या विजयाचे फलित काय याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत...
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांनी उद्धवसेनेच्या अनंत गीते यांचा पराभव करून विजय मिळवला. तटकरे हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेत रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तटकरे यांच्या विजयाचे फलित काय याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत...
लोकसभा विजयाबाबत आपले फलित काय?
महायुतीमधील सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक याला इथल्या जनतेने साथ दिली. याबद्दल मी रायगड, रत्नागिरीमधील जनतेचा ऋणी आहे. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही.
अजित पवार गटाला राज्यात अपयश का आले?
आमच्या पक्षाने राज्यात चार जागांवर निवडणूक लढवली होती. रायगडमध्ये आम्हाला यश मिळाले आहे. तीन ठिकाणी अपयश आले आहे. याबाबत आत्मपरीक्षण करू.
महायुतीला कोकणात यश मिळाल्याबाबत काय वाटते?
महायुतीला कोकणात मोठे यश मिळाले आहे. केवळ लोकसभेपुरता नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून कोकणात सर्व जागा जिंकून आणण्याचा निर्धार आहे. त्यानुसार काम करण्यात येणार आहे.
महायुतीला देशात चांगले यश मिळाले आहे. त्याबद्दल आपले मत काय?
देशभरात काँग्रेसला यावेळी निश्चित यश मिळाले आहे. कारण यावेळी सर्वपक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले होते. तरी देशातील जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही ही वस्तुस्थिती मान्य आहे. महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने ग्राम पातळीवर कार्यकर्त्यांची फळी अगदी सुरुवातीपासून तयार केली. दुर्दैवाने तशी फळी तयार करण्यात आम्ही अपयशी ठरलो. यावेळी झालेल्या चुका आम्ही सुधारू. आमच्या पक्षाने ४ जागा लढवल्या त्यातील एकच जिंकलो. असे का झाले, याचे आत्मपरीक्षण करू.
महाडमधील घटलेल्या मताधिक्याबाबत काय सांगाल?
माझ्या विजयासाठी महायुतीतील सर्व आजी-माजी आमदार, कार्यकर्ते यांनी मेहनत घेतल्याने माझा विजय सुकर झाला आहे. काही मतदारसंघात मताधिक्य कमी झाले असले तरी तेथील परिस्थिती वेगळी असते. त्याची कसर विधानसभेत भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.