मुरुड जंजिरा - मुरुडच्या ऐतिहासिक स्थळांपैकी मुरुड - आगरदांडा रस्त्यावर ६ किमी अंतरावर खोकरीचे गुंबज (गोलघुमट) वास्तुशास्राचा अजोड नमुना असून, सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे हे शिल्प इतिहासप्रेमींचे आकर्षण आहे. या वास्तुंच्या घुमट आणि कमानींतील प्रमाणबद्धता पाहण्यासारखी आहे. पुरातत्त्व खात्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे पर्यटकांना घुमटाची कलाकृती संरक्षक कुंपणाबाहेरूनच पाहून समाधान मानावे लागते आहे.येथील मुख्य प्रवेशद्वारापाशी लोखंडी दरवाजा बसविण्यात आला असून घुमटाच्या सभोवती लोखंडी तारेचे कुंपण आहे .नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकाची कामाची वेळ सकाळी ९ ते ५ अशी असली, तरी संबंधितांकडून वेळा पाळल्या जात नसल्याची पर्यटकांची तक्रार आहे, तरी पुरातत्त्व खात्याने या विषयाकडे लक्ष पुरवावे अशी मागणी आहे.जंजिऱ्याची पार्श्वभूमी माहीत असलेला प्रशिक्षित मार्गदर्शक इथे नेमल्यास इतिहासप्रेमींना वस्तुनिष्ठ माहिती मिळू शकेल, तसेच खोकरी हे ठिकाण दर्शविण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याची आवश्यकता आहे. या भागाची साफसफाई करणे आवश्यक आहे. पावसामुळे या ठिकाणी मोठे गवत वाढले आहे, तसेच दोन घुमटांनाही काळा रंग पकडला असून, या पुरातन ऐतिहासिक वास्तूची निगा पुरातन विभागाकडून केली जात नाही, वस्तू आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आली आहे. पर्यटकांसाठी कोणतीही सुविधा निर्माण करण्यात आलेली नाही. फक्त या वस्तूला तारेचे कंपाउंड वॉल टाकून सदरची जागा संरक्षित करण्यात आली आहे.सदरची वास्तू संपूर्ण दगडांनी बांधलेली असून, सदरची दगडे काळी पडलेली असून, ती घासणे व पॉलिश करणे खूप आवश्यक आहे, परंतु या बाबींकडे पुरातत्त्व खाते दुर्लक्षितपणा करीत आहे. सदरील वास्तूची सुशोभीकरण व पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या सेवा निर्माण करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक लोकांकडून करण्यात येत आहे.- गुंबज भारतीय व अरबी पद्धतीच्या शिल्पकलेचा एक उत्तम प्राचीन नमुना आहे. सिद्दी सिरुलखान, सिद्दी खैरियतखान व सिद्दी याकुतखान यांच्या या कबरी आहेत.- दगडाचे बांधकाम असलेले इंडो-सारसेनिक पद्धतीत बांधलेले हे गुंबज आहेत. त्यापैकी सर्वात मोठे गुंबज हे सिद्दी सिरूलखानचे असून, सिद्दी सिरुलखान जंजिऱ्याचा १७०७ ते १७३३ प्रशासक असल्याची ऐतिहासिक नोंद आहे.- सिद्दी याकुतखान हा १६७० ते १६७७ व १६९६ ते १७०७ या कालावधीत तो जंजिऱ्याचा नबाब होता, तर सिद्दी खैरियत खान हा याकुतखानाचा भाऊ १६७७ ते १६९६ जंजिऱ्याचा प्रशासक असल्याचा उल्लेख सापडतो.