खोपोली( प्रतिनिधी ) - खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, शिक्षण मंडळाचे माजी सभापती रोहिदास पाटील (६५) व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका निर्मला पाटील (६०) यांचे आज एकाच दिवशी कोरोनामुळे निधन झाल्यामुळे खोपोलीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी ,सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रोहिदास पाटील सलग ३५ वर्ष नगरसेवक होते. लौजी परिसरातून ते निवडून येत होते.त्यातील सलग पंधरा वर्ष ते नगर परिषद शिक्षण मंडळाचे सभापती होते.१९८५ साली त्यांनी खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका निर्मला पाटील या राज्याचे माजी राज्यमंत्री कै.बी.एल.पाटील यांच्या कन्या होत. पाटील पती-पत्नींचे एकाच दिवशी निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रोहिदास पाटील यांनी शिक्षण मंडळाचे सभापती असताना अनेक चांगले उपक्रम राबवले होते .अनेक चांगले साहित्यिक ,वक्ते खोपोलीत आणून त्यांच्या व्याख्यानांचा लाभ पाटील यांनी खोपोली करांना मिळवून दिला होता. वाचनाची त्यांना दांडगी आवड होती. शेकडो पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे होता.रोहिदास पाटील यांच्या जाण्यामुळे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व तसेच शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार हरपला आहे ,अशा शब्दात शिक्षण मंडळाचे माजी सभापती रामकृष्ण तावडे यांनी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.