खोपोली : बुद्ध पौर्णिमा आणि रविवार अशा सलग सुट्टी आल्याने मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाका, पाली फाटा, पेण रस्ता, पाली रस्ता येथे शनिवारी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यात शाळा-कॉलेजलाही सुट्टी असल्याने वाहनांच्या संख्येत भर पडली होती. पाली फाट्यावर असलेले खड्डे वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत होते. एकूणच सुट्टीसाठी मौजमजा करण्यासाठी निघालेले प्रवासी मात्र चार ते पाच तास वाहतूककोंडीत अडकल्याने हैराण झाले होते.
द्रुतगती मार्गावर चार ते पाच कि.मी., खोपोली-पेण रस्त्यावर पाली फाटा ते सारसन व पेण बाजूकडे वडखळपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. पाली रस्त्यावर अॅडलॅबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी कोकणात, अॅडलॅब, अष्टविनायक आणि अलिबागच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहने खोपोली-पाली-पेण रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते. त्यात स्थानिक वाहनांची ये-जा होती, त्यामुळे वाहतूककोंडी झाली. या वेळी खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, महामार्ग पोलीस यंत्रणेचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक श्रीरंग किसवे आदींनी वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले.अंकित साखरे, संदेश चौधरी यांनी वाहतूककोंडीत आडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. बोरघाटात अमोल कदम, मितेश शहा यांनी मदतीचा हात दिला. पाली फाटा येथे खोपोली-पेण मार्गावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होते, त्यामुळे ही वाहतूककोंडी दूर होण्यास वेळ लागत होता. एपीआय शेलारांनी घटनास्थळी आयआरबीचे गांधी व इतर अधिकाऱ्यांसह पाहणी केली. आयआरबीकडे रस्ता नसतानाही त्यांनी तत्काळ खड्डे भरून देण्यास सुरुवात केली.