याला म्हणायचं जिगर... आपुलकीने मैत्री दिनी मित्राला दिले घर भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 02:46 AM2020-08-04T02:46:44+5:302020-08-04T02:47:18+5:30
महेंद्र घरत यांनी जोपासले अनोखे नाते : वीस वर्षांपासून मुरलीधर ठाकू र यांची सोबत
पनवेल : आपल्या प्रगतीत आपले नातेवाईक, जीवलग मित्र यांचाही मोलाचा वाटा आहे. ही जाणीव बाळगणेही मोठेपणाचे लक्षण आहे. वीस वर्षांपूर्वी सोबतीला असलेला मित्र अद्यापही आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याने त्याच्यासाठी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी आपुलकी जपत कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपल्या मित्राला थेट घर भेट देऊन मैत्रीचा हा अनोखा अध्याय सुरू केला.
रविवारी मैत्री दिनाचे मुहूर्त साधत कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपला मित्र मुरलीधर ठाकूर यांना हे घर भेट दिले. पनवेल शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या रॉयल रेसिडन्सी इमारतीत सुमारे १,२०० स्क्वेअर फुटाचे घर भेट देत, आपली मैत्री जपली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या घराची किंमत कोटींच्या घरात आहे. २२ वर्षांपासून मुरलीधर हे घरत यांच्यासोबत आहेत. कामगार क्षेत्रात पदार्पण करतेवेळी ठाकूर यांच्याशी घरत यांची ओळख झाली, त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर, कामगार युनियनच्या बैठका, मोर्चे, अधिवेशन आदी सर्वच ठिकाणी ठाकूर हे घरत यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करीत असत. त्या मित्राची गरज ओळखून त्याला मी घर भेट दिले असल्याचे घरत यांनी सांगितले.
समाजकारण, राजकारण करीत असताना, मी माझ्यासोबत असलेल्या प्रत्येकाला यामध्ये वाहन चालकापासून, कामगार असो, यांना माझ्या परीने मदत करीत असतो. नेहमीच माझ्यासोबत असलेल्या प्रत्येकाला मी मदत करत असतो. यामध्ये आर्थिक असो, अथवा कोणाला घर बांधून देणे असो, अशा स्वरूपाची मदत केली आहे. यामध्ये माझे सुरक्षारक्षक, वाहनचालक, शिपायांचाही समावेश आहे. आपल्यासोबत असलेल्या प्रत्येकाची जाणीव ठेऊन आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेने मी माझ्या परीने मदत करत असतो. यामध्ये मला आत्मिक समाधान मिळतो, तसेच अनेकांचे स्वप्न माझ्यामुळे पूर्ण होत असल्याने, याचाही मला आनंद होत असल्याचे घरत यांनी सांगितले.
कामगार क्षेत्रात कामगारांच्या हितासाठी झगडत असताना, त्यांना न्याय मिळावा, याकरिता मी राष्ट्रीय इंटकच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असतो. माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाबाबत माझी आपुलकी असल्याने, या आपुलकीने मी सामाजिक कार्य करीत असतो. या भावनेने मी माझा मित्र मुरलीधर ठाकूर याला घर भेट दिले आहे. मुरलीधरसह माझ्यासोबत काम करणाºया अनेकांना मी विविध स्वरूपाची मदत केली आहे.