अलिबाग : प्रगत देशात जीवनरक्षक उपचार पद्धतीचे धडे शालेय जीवनापासूनच दिले जातात. मात्र, भारतात या जीवनरक्षक प्रथमोपचार पद्धतीबाबत कमालीची अनभिज्ञता आढळते. त्यामुळे तातडीचे प्रथमोपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जीवाचा धोका अधिकच वाढतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला बेसिक लाइफ सपोर्ट सिस्टीम उपचार पद्धतीचे ज्ञान असणे गरजेचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर साठ्ये यांनी व्यक्त केले. अलिबाग पंचायत समितीमधील अलिबाग प्रेसमध्ये आयोजित बेसिक लाइफ सपोर्ट कार्यशाळेत बोलत होते.
एखाद्या दुर्घटनेमध्ये व्यक्तीचे वा बालकाचे हृदय बंद पडले, श्वास घेता येत नसेल तर त्याचे प्राण वाचविणे गरजेचे असते; पण यासाठी काय करावे याची माहिती असणे गरजेचे असते. यासाठी बीएलएस उपचार पद्धती उपयुक्त ठरते. ही बाब लक्षात घेऊन डॉ. साठे यांनी अलिबागमधील पत्रकार, नागरिक, वाहतूक पोलीस यांच्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. ग्राहक न्यायालय न्यायाधीश उल्का पावसकर, मुख्याध्यापिका भावेश्री वाळंज, वाहतूक पोलीस एस. एम. आव्हाड, ए. जी. मोरे, बी. आरसेवार यांसह अलिबाग प्रेस असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.एखाद्या दुर्घटनेमुळे व्यक्तीचे हृदय व श्वसनक्रि या बंद पडल्यास तीन ते पाच मिनिटांच्या आत सुरू करणे गरजेचे असते, अन्यथा ती व्यक्ती ब्रेन डेड होण्याची शक्यता असते. वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईपर्यंत अशा परिस्थितीत रुग्णावर तातडीने जीवन रक्षक उपचार सुरू करणे गरजेचे असते. मात्र, या उपचार पद्धतींच्या अज्ञानामुळे ते रुग्णांना उपलब्ध होत नाहीत. यामुळे रुग्णांच्या जीवाला निर्माण झालेला धोका अधिकच बळावतो. हृदयक्रि या बंद पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देऊन, कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन तसेच एईडी नामक यंत्राचा वापर करून हृदयक्रि या कृत्रिमरीत्या चालू ठेवता येऊ शकते. यामुळे रुग्ण बचावण्याची शक्यता वाढत असते.
यासाठी या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण असणे गरजेचे असते, असे डॉ. साठ्ये यांनी पुढे सांगितले. या वेळी काही प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. जिल्हा आपत्ती निवारण विभागाच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र अशा कार्यशाळांचे आयोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली. या वेळी डॉ. प्राजक्ता वरसोलकर, डॉ. निशा तेली, डॉ. कीर्ती साठ्ये, डॉ. अमृत माने, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्षप्रकाश सोनवडेकर आदी उपस्थित होते.