- दीपक साळुंखेमहाड : महाड तालुक्यातील ऐतिहासिक बिरवाडी समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. नियोजनाचा अभाव असल्याने स्वच्छता, रस्ते, पाणी, वीज या मूलभूत समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे, तर आठ हजार लोकसंख्या व साडेतीन हजारपेक्षा जास्त मतदार असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये कोरमअभावी ग्रामसभा तहकूब होत असल्याने महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे महाड औद्योगिक वसाहतीलगत वसलेल्या बिरवाडी गावामधील समस्यांना जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण आहे.गावाच्या दोनही बाजूला औद्योगिक वसाहत वसली असल्याने या गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वर्षातून होणाऱ्या चारही ग्रामसभा या कोरमअभावी तहकूब होत असल्याने महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे.तसेच सांडपाण्याची गटारे तुडुंब भरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर ग्रामपंचायतीच्या घनकचरा उचलण्याकरिता दोन घंटागाड्या कार्यरत आहेत. सलग सुट्टीच्या कालावधीमध्ये बिरवाडीच्या मुख्य रस्त्यालगत कचºयाचे ढीग निर्माण होत असल्याने शासनाच्या स्वच्छता मोहिमेचे बारा वाजल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये कुंभारवाडा, मधले आवाड, आदर्शनगर, नवीन बाजारपेठ या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत असून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यांची देखील दुरवस्था झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीमधील सांडपाणी थेट काळ नदीपात्रात जात असल्याने काळ नदीचे पात्र दूषित झाले असून याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ग्रामपंचायतीला वारंवार नोटीस बजावली आहे.बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये एकूण १७ ग्रामपंचायत सदस्य असून या ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पक्षाचे १५ सदस्य तर विरोधी पक्षाचा प्रत्येकी एक एक सदस्य निवडून आला आहे. ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक सभेमध्ये गावातील या समस्यांबाबत आवाज उठविला नसल्याची माहिती मिळाली आहे.महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या राष्ट्रीय पेयजल योजना कामाबाबत तक्रारी झाल्याने पाच कोटी रुपयांची योजना मंजूर होऊन देखील बिरवाडीची पाणीसमस्या कायम आहे. या पाणी योजनेवर फिल्ट्रेशन प्लांट बसविण्याची तरतूद नसल्याने नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होतो. बिरवाडीमधील सांडपाणी समस्या सोडविण्याकरिता उद्योगमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून ती मागणी अपूर्ण असल्याने या ठिकाणी मातीचा बंधारा घालून सांडपाणी काळ नदीपात्रात जाण्यापासून रोखण्याच्या कामात दरवर्षी हजारो रुपये खर्च होत असल्याची माहिती बिरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळाली आहे.सुरक्षेचाही प्रश्नबिरवाडीमध्ये लोकसहभागातून उभारलेली पोलीस चौकी बंद असल्याने, तसेच कायमस्वरूपी वाहतूक पोलीस या ठिकाणी नसल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर चोरी, घरफोडी यासारख्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आबासाहेब पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप करावा लागत आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाºयांची उदासीनता दिसून येत आहे.
बिरवाडी समस्यांच्या विळख्यात, नियोजनाचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 3:40 AM