बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरपंचपदी बिनविरोध निवडून आलेल्या प्रमिला मेंदाडकर व ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ खरगावकर यांच्याविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरताना देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी श्रीवर्धन तहसीलदारांना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे कारवाई करण्यात आली आहे.कुडगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये घेण्यात आली होती. यामध्ये सरपंच पदासाठी खुल्या प्रवगार्तून प्रमिला मेंदाडकर यांचा एकमेव अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता. प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी स्थावर मालमत्तेचा तपशील देताना आपल्याकडे कोणत्याही प्रकारे संयुक्त मालकीची किंवा मालकीची जमीन नसल्याचे नमूद केले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांचे पती विनोद यांच्या नावे मौजे कुडगाव व हरवीत येथे मालकीची जमीन असल्याचे तक्रारदार एजाज हवालदार यांनी पटवून दिले.तर, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ खरगावकर यांनी कोणत्याही प्रकारे फौजदारी गुन्हे दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केले होते. परंतु त्यांच्याविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून याबाबत सदर निकाल न्यायालयामध्ये प्रलंबित आहे.याविरोधात कुडगाव येथील माजी उपसरपंच एजाज हवालदार यांनी जिल्हाधिकाºयांकडे दिलेल्या तक्रारीची शहानिशा व पूर्ण चौकशीअंती रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी श्रीवर्धन तहसीलदारांना प्रमिला मेंदाडकर व जगन्नाथ खरगावकर यांच्या विरोधामध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यावरून संबंधित मंडळ अधिकारी सुनील मोरे यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.कित्येक महिने प्रलंबित असलेली तक्रार ‘आपले सरकार’ या अॅपच्या मदतीने तत्काळ निकाली निघाली. या निकालामुळे निवडणूक नामनिर्देशन भरताना खोटी माहिती भरणाºयांना जरब बसेल.- एजाज हवालदार, माजी सरपंच (तक्रारदार)
कुडगाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:57 PM