रोह्यात कौलारू घर भस्मसात; मोठे आर्थिक नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 11:59 PM2019-12-08T23:59:28+5:302019-12-08T23:59:47+5:30
रोहा शहरातील मीना बाजारमध्ये बोरी गल्लीतील एका लाकडी कौलारू घराला अचानक आग लागली.
धाटाव : रोहा शहरातील मीना बाजारमध्ये बोरी गल्लीतील एका लाकडी कौलारू घराला अचानक आग लागली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या घराचा वापर थंडपेयाच्या गोडाऊनसाठी होत असल्याचे दिसून आले. या आगीत लाखो रुपयांची वित्तहानी झाली असून, सुदैवाने जीवितहानी मात्र टळली. अग्निशामक दलाच्या जवानांना ही आग पाऊण तासात आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
रविवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान मीना बाजारमध्ये बोरी गल्लीतील अण्णासाहेब सावंत सहकारी बँकेसमोर असलेल्या लाकडी कौलारू घराला अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. रोह्यातील व्यापारी शाह हे या घराचा वापर थंडपेयाचे गोडाऊन म्हणून करीत असल्याचे समजते.
यामध्ये थंड पेयाच्या बाटल्या तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. या साहित्याने पेट घेतल्यामुळे लाकडी कौलारू असलेले हे घर मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून अक्षरश: बेचिराख झाले. या आगीची दाहकता भयानक असल्यामुळे शेजारच्या बिल्डिंग, घरांना याची झळ पोहोचली, तर आगीचे डोंब सर्वत्र पाहवयास मिळाले. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांना ही आग पाऊण तासात नियंत्रणात आणली.