बिरवाडीत काळनदीवरील कोल्हापुरी बंधारा तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 01:16 AM2019-11-07T01:16:51+5:302019-11-07T01:17:13+5:30
महापुरात नुकसान : दुरुस्तीसाठी निधी न मिळाल्यास पाणीप्रश्न होणार गंभीर; शेतकऱ्यांची होणार गैरसोय
बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी काळनदीवरील कोल्हापुरी बंधारा महापुरामध्ये तुटला. यामुळे दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध न झाल्यास बिरवाडी परिसरातील पाणी समस्या गंभीर बनण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये बिरवाडी काळनदीवरील कोल्हापुरी बंधाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या कोल्हापुरी बंधाºयावर महापुराच्या वेळी मोठमोठी लाकडे येऊन आदळली, त्यामध्येच या कोल्हापुरी बंधाºयाच्या बिरवाडी बाजूकडील भाग पुराच्या पाण्याने निकामी झाला; तर बंधाºयाच्या वरील भागांमध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने या बंधाºयावरून होणारी शेतमालाची वाहतूक महाराष्ट्र शासनाच्या लघु-पाटबंधारे विभागाने पूर्णपणे बंद केली आहे. यामुळे बिरवाडी, खरवली भागातील शेतकऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याबाबत लघु-पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बंधाºयाच्या दुरुस्तीकरिता अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ या बंधारादुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तीन ग्रामपंचायतींमधील गाव, वाड्यांना होतो पाणीपुरवठा
बिरवाडी काळनदीवर लघु-पाटबंधारे विभागामार्फ त कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा घालून नदीमधील पाणीपातळी वाढविली जाते, त्यानंतर हे पाणी वापराकरिता एमआयडीसीच्या जॅकवेलमधून पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्राकडे पाठवण्यात येते. त्यानंतर निगडे, मोहोत, भावे, या ग्रामपंचायतींमधील अनेक गावे, वाड्या यामधील जनतेला याच पाण्याचा पुरवठा जॅकवेलद्वारे केला जातो. डिसेंबर अखेरपर्यंत कोल्हापुरी बंधाºयाने पाणीसाठा साठविला जातो. मात्र, बंधाºयाचे नुकसान झाल्याने या परिसरातील नागरिकांना पाणीसमस्येचा सामना करावा लागणार आहे.