कोलीवलीच्या सटू आईच्या यात्रेला आजपासून प्रारंभ
By admin | Published: January 9, 2016 02:16 AM2016-01-09T02:16:35+5:302016-01-09T02:16:35+5:30
तालुक्यातील नेरळजवळील कोलीवली गावातील नवसाला पावणाऱ्या सटूआई देवीचा जत्रा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो
कर्जत : तालुक्यातील नेरळजवळील कोलीवली गावातील नवसाला पावणाऱ्या सटूआई देवीचा जत्रा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षीही या देवीचा जत्रा उत्सव शनिवारी (९ जानेवारी) व रविवार (१० जानेवारीला) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरळपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलीवली गावात सटूआई देवीचे जागृत देवस्थान आहे. हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे. पौष महिन्याच्या पहिल्याच दिवशी या जत्रेचे आयोजन करण्यात येते.त्यामुळे या जत्रेनिमित्ताने भक्तगण येथे देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या जत्रेसाठी कर्जत तालुक्यासह रायगड, ठाणे, लोणावळा, खंडाळा, कल्याण, भिवंडी, अशा अनेक ठिकाणाहून भक्तगण येतात.
शनिवारी सायंकाळी ४ वाजता सटूआई देवीचे पूजन, ५ वाजता एकादशी प्रासादिक भजन मंडळ चामटोली यांचे भजन, ७.३० वाजता देवीची पालखी मिरवणूक तर रात्री १० वाजता जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ नेवाळी यांचे भजन होणार आहे. रविवार सकाळी ८ वाजता सटूआई देवीचा जत्रा उत्सव होणार आहे. तरी दोन दिवस येणाऱ्या भाविकांनी या जत्रेत शांतता राखावी, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. (वार्ताहर)