कोंढाणे धरणाचे पाणी कर्जत तालुक्याला मिळाले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:11 AM2018-11-24T00:11:37+5:302018-11-24T00:11:52+5:30
युती शासनाने कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित केले आहे. हे धरण कर्जत तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. त्याचे पाणी कर्जत तालुक्यालाच मिळाले पाहिजे या मागणीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सादर केली आहे.
कर्जत : युती शासनाने कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित केले आहे. हे धरण कर्जत तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. त्याचे पाणी कर्जत तालुक्यालाच मिळाले पाहिजे या मागणीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सादर केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिलेल्या निवेदनात लाड यांनी, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचे काम २०११ मध्ये सुरू करण्यात आले होते. त्या संदर्भात काही तक्रारी झाल्याने धरणाचे काम मधल्या काळात थांबविण्यात आले होते. मागील वर्षी कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदरचा निर्णय घेताना स्थानिकांना फक्त १० टक्के पाणीसाठा मंजूर केलेला आहे व उर्वरित पाणीसाठा सिडकोला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र पाणीसाठ्यासाठी जमीन देणाऱ्या कर्जत तालुक्यावर हा अन्याय आहे. सदरच्या धरणासाठी तालुक्यातील चार गावे प्रकल्पबाधित होऊनही स्थानिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळणार नसल्याने शेतकºयांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. कर्जत तालुका हा प्रामुख्याने पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेला तालुका असून यावरच लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. वर्षाकाठी लाखो पर्यटक पर्यटनासाठी तालुक्यात विविध गावांत येत असतात. त्या त्याठिकाणच्या पाणीटंचाईमुळे तालुक्यातील पर्यटनावर विपरीत परिणाम होणार आहे. तालुक्याप्रमाणेच कर्जत शहर व शहरालगतच्या गावात नागरीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे.
सिडकोला देण्यात आलेले कोंढाणे धरण हे फक्त आणि फक्त पाण्यासाठी कर्जत तालुक्याला देण्यात यावे. सिडकोला कोंढाणे धरण देण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा व कोंढाणे धरण कर्जत तालुक्यासाठीच देण्यात यावे अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.