राबगाव/पाली : सुधागड तालुक्यातील कोंडगावचा रस्ता जवळपास ३० ते ३५ वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.नवघर - ठाणाले या गावानजीक कोंडगाव गाव आहे. मात्र, गावात जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. गेल्या अनेक वर्षांत रस्त्याची साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. कोंडगावचे १९८३-८४ मध्ये पुनर्वसन झालेला आहे. हे गाव प्रकल्पग्रस्त असून आजही विकासापासून वंचित आहे. प्रकल्पग्रस्त गावासाठी असणारे शासनाचे कोणतेही विकास धोरण या गावात राबवण्यात आलेले नाही.
नवघर ते कोंडगाव असा वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याची खड्डे व दगड-मातीमुळे अक्षरश: दुर्दशा झाली आहे. कोंडगावची वाट अतिशय बिकट झाल्याने येथील ग्रामस्थांसह, प्रवासी, रुग्ण, विद्यार्थी, शेतकºयांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.वाहतूक व प्रवासासाठी खडतर व धोकादायक बनलेल्या मार्गाकडे संबंधित खात्याचे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे. मार्गाचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. सदर मार्ग लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत असून वर्षानुवर्षे मार्गाच्या दुरवस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.दुरवस्थेमुळे गावात वाहन येत नसल्याने अडचणीच्जीवघेणे खड्डे व मार्गातील दगड-गोट्यामुळे चालकांसह पादचारीही हैराण आहेत. या मार्गालगत कोंडगाव, कोंडगाव आदिवासीवाडी, कोंडगाव धनगरवाडा आदी गावे असून लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत कोणतेही वाहन पोहोचत नसल्याने येथील रुग्ण, गर्भवती महिलांना रात्री अपरात्री दवाखान्यात नेताना असंख्य अडचणींना व त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी वर्गाला शेतावर जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याने शेतकºयांना देखील हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.कोंडगाव मार्गावर दुचाकींचे अनेक अपघात घडले आहेत. तरी संबंधित अधिकारी अजून किती अपघातांची वाट पाहत आहेत. लवकरच या मार्गाचे डांबरीकरण व मजबुतीकरण संबंधित खात्याने करावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.- गणेश कदम, ग्रामस्थ कोंडगाव