कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेस सुरुवात
By निखिल म्हात्रे | Published: November 20, 2023 05:50 PM2023-11-20T17:50:58+5:302023-11-20T17:51:13+5:30
48व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेस सोमवारपासून (दि. 20) प्रारंभ झाला.
अलिबाग - 48व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेस सोमवारपासून (दि. 20) प्रारंभ झाला. ही स्पर्धा 25 नोव्हेंबर पर्यंत खेळली जाणार आहे. कोकण परिक्षेत्रातील एकूण 7 जिल्ह्यांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 48 व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे यजमानपद यंदा रायगड पोलीस दलाकडे आहे. पाच दिवस चालणारी ही स्पर्धा सरखेल कान्होजी आंग्रे क्रीडा नगरी, पोलीस मुख्यालय अलिबाग व आर.सी.एस. क्रीडा संकुल, कुरूळ वसाहत, अलिबाग येथे खेळली जाणार आहे.
नवी मुंबई आयुक्तालयाचे 135, मिरा भाईंदर आयुक्तालय 55, ठाणे ग्रामीण 74, रायगड 16, रत्नागिरी 60, सिंधुदुर्ग 72, पालघर 122 असे एकूण 681 पोलीस खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धांमध्ये 7 सांघिक खेळ प्रकार व 9 वैयक्तीक क्रीडाप्रकार आहेत. फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, वू-शू, वेट लिफ्टिंग, कुस्ती, कराटे, कब्बडी, हँडबॉल, खो-खो, अॅथलेटिक्स, पोहणे या क्रीडा प्रकारांचा समावेश या स्पर्धेत आहे, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
पोलिस विभागाची स्पर्धा ही सर्व नागरीकांना पाहता येणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनी स्पर्धांना उत्स्फुर्त प्रतिसाद देवुन आपली जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.