कोपरा उड्डाणपूल दोन महिने बंद; खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:01 PM2018-10-13T23:01:16+5:302018-10-13T23:01:46+5:30
पनवेल : सायन- पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलावरील खड्डे सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे. उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कामाला ...
पनवेल : सायन-पनवेलमहामार्गावरील उड्डाणपुलावरील खड्डे सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे. उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कामाला सुरु वात करण्यात आली आहे. कोपरा उड्डाणपुलाचा भुयारी मार्गही सुमारे दोन ते अडीच महिने बंद राहणार आहे.
उड्डाणपुलावर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी पीक्यूसी या विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या कामात अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून कोपरा उड्डाणपुलाखालील भुयारी मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या ठिकाणाहून होणारी वाहतूक हिरानंदानी मार्गे सायन-पनवेल महामार्गाकडे वळविण्यात आली आहे. तसेच कोपरा गाव व हुंदाई शोरूम सेक्टर -१० कडे जाणारे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. शनिवारी कोपरा भुयारी मार्गाची वाहतूक बंद केल्याने वाहनचालक संभ्रमात होते. कोपरा भुयारी मार्गाखालून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. या कामामुळे महामार्गावर सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी झाली होती. वाहनांच्या १ किलोमीटरपेक्षा जास्त रांगा लागल्या होत्या.
कोपरा उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणासाठी भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत. पुढील दोन ते अडीच महिने काँक्रीटीकरणाचे काम सुरू राहणार असल्याने या ठिकाणची वाहतूक बंद राहणार आहे. काँक्रीटीकरणासाठी पीक्यूसी या विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
-ए. पी. पाटील, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग