कोथुर्डे धरणाला पडले भगदाड
By Admin | Published: July 6, 2015 02:06 AM2015-07-06T02:06:50+5:302015-07-06T02:06:50+5:30
महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडून धरणाला धोका निर्माण झाला आहे.
बिरवाडी : महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडून धरणाला धोका निर्माण झाला आहे. तर खैरे धरणाच्या दुरुस्तीबाबत मंत्र्यांच्या स्तरावर बैठक झाल्याने या धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी रविवारी माजी आ. तथा भाजपा मुंबई प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केली. यावेळी धरणांची उपयुक्तता व त्यांना असणाऱ्या धोक्याची गंभीर दखल घेत याची कामे युध्दपातळीवर करुन घेऊन स्थानिक अधिकाऱ्यांनी आपल्याकडे पाठपुरावा करावा अशा सूचना यावेळी दरेकर यांनी दिल्या.
रविवारी सकाळी माजी
आ. दरेकर यांनी धोकादायक स्थितीत असणाऱ्या कोथुर्डे धरणाची पाहणी केली. यावेळी या ठिकाणी उपस्थित असणारे पाटबंधारे कोलाड विभागाचे शाखा अभियंता प्रकाश पोळ यांनी धरणाला गेल्या वर्षी पावसात पडलेल्या भगदाड व त्यामुळे धरणाला निर्माण झालेल्या धोक्याची माहिती दिली. या कोथुर्डे धरणावर महाड नगर पालिका व रायगड विभागातील २२ गावांच्या पाण्याच्या योजनांना पाणीपुरवठा होत आहे.
या धरणाच्या दुरुस्तीसाठी ३.४२ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार असून केवळ डिझाइनला मान्यता न मिळाल्यामुळे फेब्रुवारी २०१५ मध्ये धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. (वार्ताहर)