उरणमध्ये १०० बेड, १० आयसीयू बेडचे कोविड सेंटर लवकरच होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:50 AM2020-09-20T00:50:17+5:302020-09-20T00:50:27+5:30
सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांकडून पाहणी । नागरिकांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : उरणकरांंसाठी १०० बेडचे अद्ययावत कोविड सेंटर उभारण्यासाठी शनिवारी (१९) सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय शिंदे यांनी बोकडविरा येथील सिडको प्रशिक्षण केंद्र व केअर पॉइंट रुग्णालयाची पाहणी केली. कोविड सेंटर लवकरच सुरू करून सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
उरण-पनवेल महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्ष व सेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उरण, पनवेल तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, मंत्रालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत उरणकरांंवर उरणमध्येच उपचार करण्यासाठी १०० बेडचे कोविड सेंटर १० आयसीयू बेडसहित उभारण्याबाबत चर्चा करण्यात झाली होती. त्यानुसार, शनिवारी (१९) सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय शिंदे यांनी बोकडविरा येथील सिडको प्रशिक्षण केंद्र व केअर पॉइंट रुग्णालयाची पाहणी केली. पाहणी नंतर १०० बेडचे कोव्हीड सेंटर १० आयसीयू बेडसहित लवकरच सुरू करून सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
यावेळी उरण-पनवेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील, माजी आमदार शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.