रायगड जिल्ह्यात कोविड योद्धा निघाला भामटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:34 AM2020-09-20T00:34:32+5:302020-09-20T00:35:19+5:30

स्वातंत्र्य दिनी केला होता गौरव । कोविड योद्धा पुरस्कार काढून घेण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Kovid warrior found fraud man in Raigad district | रायगड जिल्ह्यात कोविड योद्धा निघाला भामटा

रायगड जिल्ह्यात कोविड योद्धा निघाला भामटा

Next

आविष्कार देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्हा प्रशासनाने १५ आॅगस्टला कोविड योद्धा पुरस्कारांची खैरात वाटली. यातील गंभीर बाब म्हणजे, ज्यांना कोविड योद्धा म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवले, त्याच्यावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे कोविड योद्धा पुरस्काराची प्रतिमा मलीन झाल्याचे चित्र आहे.


चुकीच्या पद्धतीने दिलेला पुरस्कार संबंधित व्यक्तीकडून तत्काळ काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, मदतीच्या नावाखाली डॉ.साजिद सैय्यद नावाच्या एका भामट्याने जिल्हा प्रशासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांसोबत असलेली जवळीक दाखवून अलिबागेतील व्यापऱ्यांना तब्बल १८ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने तक्रार दाखल केलेली नसली, तरीही सरकारी अधिकाºयांनीच ओळख करून दिल्यानंतर राजकारणी लोकांमध्येही या भामट्याने जाळे पसरवून त्यांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच भामट्याला जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र दिनी कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले होते.


हा भामटा आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन फोरम या संस्थेचा अध्यक्ष असल्याचे सांगत होता. ती संस्था नोंदणीकृत आहे किंवा कसे, ही साधी गोष्ट तपासण्याची गरज पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना कोणालाही भासली नाही, हे विशेष. या भामट्याला देशाच्या स्वातंत्र दिनी पालकमंत्री गौरवितात. भामट्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी हजेरी लावतात. कसली ही सरकारी आणि प्रशासकीय व्यवस्था? सरकारकडून एखाद्याला गौरवताना त्याची साधी चौकशी पोलिसांमार्फत का करता येत नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी विचारला आहे.


कोविड योद्धा पुरस्कार गौरवताना पुरस्कारार्थींच्या नावाची शिफारस कोणी केली, त्यासाठी कोणती समिती गठीत केली होती का, कोणते निकष लावले, याची माहिती मिळणे गरजेचे आहे. साजिदसारख्या भामट्याला गौरवण्यात आल्याने कोविड योद्धा पुरस्कारांची प्रतिमा मलिन झाली आहे, असे अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सांगितले.


यापुढे विविध कार्यक्रमांमध्ये पुरस्कार वितरण करताना पालकमंत्र्यांनीही खातरजमा करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याहस्ते गौरव म्हणेज राज्य सरकारच्या हस्ते गौरव असा अर्थ होतो, असेही अ‍ॅड.पाटील यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, एका भामट्याला जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री यांच्या हस्ते गौरवल्याने पुरस्काराचे महत्त्व कमी झाले आहे. ज्यांनी खरोखरच चांगले काम केले, त्यांना याच पुरस्कारने गौरवल्याने त्यांनाही या पुरस्काराबाबत अभिमान वाटेल असे दिसत नाही, शिवाय जिल्हा प्रशासनाच्या कामाची पद्धत कशी मनमानी आहे, हेच यातून अधोरेखित होत असल्याचे बोलले जाते.

कोविड योद्धा पुरस्कार कोणाला देणार, यासाठी माझी मान्यता घेण्यात आली नव्हती. रात्री उशिरा पुरस्कारार्थींची थेट यादी मला मिळाली होती. याबाबतीमध्ये प्रशासनाने कोणते निकष लावले, समिती गठीत केली होती का, याची माहिती नव्हती. चुकीच्या पद्धतीने दिलेला काविड योद्धा पुरस्कार तत्काळ काढून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देत आहे, तसेच यापुढे खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.
- आदिती तटकरे (पालकमंत्री रायगड)

चांगले काम करणारी स्वयंसेवी संस्था असल्याबाबत आम्हाला इंटरनेटवर त्यांची माहिती मिळाली होती. सुरुवातीला विश्वास संपादन करायचा आणि नंतर फसवणूक करायची, अशी त्यांची पद्धत आहे. त्याबाबत संशय आल्याने अधिक तपास केला असता, तो फसवणूक करणारा असल्याचे आढळले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
- निधी चौधरी (जिल्हाधिकारी, रायगड)

Web Title: Kovid warrior found fraud man in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.