कर्जत : येथील एकोणीस वर्षीय क्रिशा दिनेश जैन परदेशात वैमानिक शिक्षण घेऊन परतली असून तिचे कर्जतकरांनी शनिवारी मिरवणूक काढून स्वागत केले. क्रिशा ही जैन समाजातील रायगड जिल्ह्यातील पहिलीच महिला वैमानिक आहे, असे तिचे वडील दिनेश जैन यांनी सांगितले. सोमवारी ती पुढील प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे रवाना होणार आहे.
येथील जैन मंदिरात तिचा कौतुक सोहळा करण्यात आला. याप्रसंगी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी सरपंच मधुकर घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान चंचे, युवक शहराध्यक्ष सोमनाथ पालकर, उद्योजक सुभाष सावंत, जैन श्वेतांबर संघाचे अध्यक्ष जयंतीलाल परमार, चंद्रकांत डागा आदी उपस्थित होते. क्रिशाची तिच्या निवासस्थानापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. निवासस्थानाजवळ जाताच तिच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
सातवीत असताना पाहिले स्वप्नक्रिशा ही कर्जत शहरातील दिनेश प्रेमचंद जैन व संगीता जैन यांची कन्या. तिचे आजोळ चेन्नईत आहे. सातवीची परीक्षा दिल्यानंतर विमानाने ती आजोळी जाण्यास निघाली. तेव्हा तिने मीसुद्धा वैमानिक होणार असे आपल्या आई-वडिलांना सांगितले होते.
३२७ यशस्वी उड्डाणे५ नोव्हेंबर २०२२ रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील टू फ्लाय एअर संस्थेत वैमानिक शिक्षण घेण्यासाठी ती गेली होती.जिद्द व मेहनतीच्या जोरावर अवघ्या सात महिन्यांत ती वैमानिक परीक्षेत उत्तीर्ण झाली. या कालावधीत तिने एकूण ३२७ यशस्वी विमान उड्डाणे केली आहेत. १९ डिसेंबर २०२२ रोजी तिच्या प्रशिक्षणाच्या अवघ्या सव्वा महिन्याच्या कालावधीत तिने एकाच दिवसात तब्बल १२ विमान उड्डाणे केली.
मुलींनी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. विविध क्षेत्रांत त्यांना अनेक संधी आहेत. तेथे युवतींनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर आपला ठसा उमटविला पाहिजे. त्यासाठी समाज व कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. मला समाज व कुटुंबाने पाठिंबा दिल्याने नवे अवकाश खुले झाले. - क्रिशा दिनेश जैन