चिरनेरला राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार व आरोग्य शिबिर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 05:21 PM2023-12-04T17:21:00+5:302023-12-04T17:21:40+5:30
पथनाट्यातून आरोग्य विषयक जनजागृती व प्रबोधन.
मधुकर ठाकूर, उरण : नेरूळ येथील डी. वाय. पाटील दिम टू बी युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे ग्रामीण पुनर्रचना आरोग्य सेवा श्रमसंस्कार, सात दिवसीय निवासी शिबिर चिरनेर येथे पार पडले.डी वाय पाटील संस्थेचे संस्थापक विजय ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्षा शिवानी पाटील, कुलगुरू डॉ. वंदना मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली २८ नोव्हेंबर पासून हे शिबिर सुरू झाले होते.
शिबिराचे उद्घाटन प्राचार्या दिपा रेड्डी, उपसरपंच सचिन घबाडी, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, डॉ. सुधीर केणी, महागणपती मेडिकलच्या संचालिका सोनाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद मच्छिंद्र कानवडे, कार्यक्रम आधिकारी प्रा. सेरीना थिओडोर, सहकारी प्रा. अंजली यादव, तसेच अध्यक्ष सुशील वैष्णव, उपाधक्ष शितल इंगळे, खजिनदार प्रांजल घाडगे, निवृत्त समन्वयक कुणाल जैसवाल , प्रशासक ॲन्सी चेरियन, दीक्षा शर्मा, गटप्रमुख कु. श्वेता साळुंखे, कु, दत्तात्रय सुमभे, कु. सानिका पालवणकर, कु. हेंना एलसा ही सर्व मंडळी सदर शिबिराची जबाबदारी पार पाडली . शिबिरात एकूण ६० शिबिरार्थी सहभागी झाले होते. शिबिरातील मुख्य उपक्रम म्हणजे ग्राम आरोग्य सर्वेक्षण, सामाजिक सेवा श्रमदान, बाल माता आरोग्य सर्वेक्षण, वृक्ष रोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, व स्वच्छता जनजागृती हे असून, श्रमदानांतर्गत शिबिरार्थींनी चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील तलाव, विहिरीचा परिसर तसेच श्री महागणपती मंदिर परिसर आणि अक्कादेवी परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. त्याचप्रमाणे चिरनेर गावातील ठीक ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यात आले.
श्री महागणपती भक्त निवासाची देखील शिबिरार्थींनी रंगरंगोटी केली. सात दिवसांच्या या मोहिमेत चिरनेर गावातील अनेक ठिकाणी जाऊन त्या त्या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. एड्स या भयावह रोगाविषयी समाज प्रबोधन व जनजागृती व्हावी यासाठी रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर कमी वयात लग्न केल्याचे दुष्परिणाम आणि बालमाता संगोपन यातून आदिवासी बांधवांना पथनाट्यातून आरोग्य विषयी जनजागृती व प्रबोधन केले. तसेच डेंगू, मलेरिया, पल्स पोलिओ निर्मूलन, तसेच स्वच्छ भारत अभियान, स्त्री पुरुष समानता बेटी बचाव बेटी पढाव याविषयी देखील विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली. दरम्यान ग्रामपंचायत हद्दीतील ३०० रहिवाशी नागरिकांच्या घरांना भेटी देऊन, शिबिरार्थीनी सामाजिक व आरोग्य विषयक सर्वेक्षण केले. सार्वजनिक व वैयक्तिक आरोग्य परिसर स्वच्छता याबाबत शिबिरार्थींनी अद्यावत माहिती गोळा करून त्याविषयीचे मार्गदर्शनही केले .
प्राथमिक शाळा चिरनेर येथील २३२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना पोषण आहार देण्यात आला. तर अक्कादेवी आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.नाट्य दिग्दर्शक संतोष ठाकूर, निवृत्त क्लास वन अधिकारी श्रीधर मोकल, माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मुंबईकर यांच्या सहकार्याने इंद्रायणीच्या डोंगरावर विविध जातीची झाडे लावून, याआधी रोपण करण्यात आलेल्या २०० झाडांना शिबिरार्थींनी पाणी दिले.