- दत्ता म्हात्रे पेण : पावसाळा तोंडावर आलेला असताना आता शेतीमधील कामांवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. शेतीमधील मशागतीची कामे पूर्ण झाली असून, बळीराजा पेरणीची तयारी करण्यासाठी शेतात जाऊ लागला आहे. आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांबरोबरच कृ षी विभाग देखील सज्ज झाला आहे. भात बियाणे विक्री केंद्रांवर खरेदी केलेल्या बी- बियाणांची गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा कृषी विभागाने १५ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यातील २१४ कृषी केंद्रावर विविध कंपन्यांचे विक्रीसाठी ठेवलेल्या बियाणांचे २५९ नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पुणे येथील बीज अंकुरण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याचे बीज तपासणी मोहीम अधिकारी अशोक पवार यांनी पेण येथील कोकण कृषी विकास केंद्रावर तपासणी मोहिमेप्रसंगी लोकमतशी बोलताना सांगितले.रायगड जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. ऋतुपर्वानुसार येणारा वर्षाकाळ हा सजीव सृष्टीत समृध्दी घेऊन येतो. त्यामुळे या सर्व सजीव सृष्टीला पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा असते. शिवारात बीज रोपणासाठी शेतकरी या हंगामात बी बियाणे पेरतो. ते बीज निर्भेळ गुणवत्तापूर्ण असे असावे यासाठी राज्य सरकार व रायगड जिल्हा परिषदेचा कृषी विभागाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. रायगड जिल्ह्यात दोन भरारी पथके व १५ गुणवत्ता गुण नियंत्रण निरीक्षकांची नेमणूक केली आहे. यामध्ये राज्यशासनाच्या निरीक्षकांनी १०० नमुने तर जिल्हा परिषदेच्या निरीक्षकांनी १५० असे एकूण २५० बी बियाणांचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पुणे येथील बीज अंकुरण प्रयोगशाळेत पाठविले आहेत. मान्सूनच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांना कोणत्याही उणिवा भासणार नाहीत अशी तयारी कृषी विभागाने केली आहे.>रायगड जिल्ह्यातील खरीप हंगामात भात लागवडीचे एकुण २लाख १हजार ३२२ हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामासाठी १ लाख ४१ हजार २०० हेक्टर लागवड क्षेत्रापैकी यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १ लाख १८ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रावर भात, तृणधान्य, कडधान्य पिके घेतली जातात. या लागवड क्षेत्रातील निव्वळ भात लागवडीचे एकुण १ लाख १८ हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी कृषी विभागाने २१ हजार क्ंिवटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी जवळपास १० हजार क्विंटल बीयांणांची आवक झाली आहे. उर्वरीत बी बियाणांची आवक लवकरच होइल. उपलब्ध बियांणाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
पेणमध्ये २५० बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:16 AM