मधुकर ठाकूर उरण - राज्यातील लाखो शिवभक्त, दासभक्तांना अभिमान वाटेल असे जासई-उरण येथे ‘जेएनपीए’ने ३२ कोटी खर्चून ऐतिहासिक २० मीटर उंचीचे शिवस्मारक उभारले आहे. मात्र, प्रसार, प्रचार करण्यात जेएनपीए प्रशासन अपयशी ठरल्याने शिवस्मारकाच्या देखभालीवरही कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. या स्मारकाकडे पर्यटकांसह शिवभक्त, दासभक्त फिरकतच नाहीत. वाढत्या खर्चामुळे हे स्मारक ‘जेएनपीए’साठी पांढरा हत्ती ठरू लागले आहे.
९ हजार चौरस मीटर क्षेत्रात १९.३ मीटर उंचीच्या शिवस्मारकासह संग्रहालयाचीही निर्मितीही केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वस्तूंसह चित्र, शिल्पं लावली आहेत. तळमजल्यावर सभागृह, ग्रीनरूम, संग्रहालय आहे. दुसऱ्या मजल्यावर एक्झिबिशन हाॅल आहे. तिसऱ्या,चौथ्या मजल्यावर व्ह्यूज गॅलरी, व्हिज्युअल सिस्टीमची व्यवस्था केली आहे.
१९.३ मीटरचा अष्टधातूंचा पुतळा पाचव्या मजल्यावर ६ मीटर उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि चार मीटर उंच रामदास स्वामींचा अष्टधातूंचा पूर्णाकृती पुतळा आहे. याची तळमजल्यापासून उंची १९.३ मीटर आहे. शिवस्मारकाचे १७ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले होते.
महिन्याला २२ लाखांचा खर्च कोरोना काळात दोन वर्षे बंद ठेवलेले शिवस्मारक आता शिवप्रेमी, पर्यटकांसाठी नाममात्र १० रुपये तिकीट दरात खुले केले. मात्र, ते फिरकेनासे झाले आहेत. परंतु, स्मारकाच्या देखभालीवरच जेएनपीएकडून महिन्यासाठी २२ लाख ४०,८९७, तर वर्षाकाठी २ कोटी ६८ लाख ९०,७७० रुपये खर्च होत आहेत.
शिवस्मारकाची उभारणी आर्थिक फायद्यासाठी केलेली नाही. मात्र प्रसार, प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग, सामाजिक संस्थेची मदत घेऊन पर्यटकांमध्ये वाढ होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील. - मनीषा जाधव, वरिष्ठ प्रबंधक तथा सचिव, जेएनपीए