नेरळ : कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या ३१ आॅगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी घेण्यात आली. कर्जत तहसील कार्यालयात झालेल्या या मतमोजणी वेळी निवडणूक प्रशासनाने उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना पावसाचा मोठा फटका बसला. पावसात उभे राहून ताटकळत भिजत आपले निकाल उमेदवारांना घ्यावे लागले.
कर्जत तालुक्यातील नेरळ, वाकस, उमरोली, रजपे, जामरुख या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका ३१ आॅगस्ट रोजी घेण्यात आल्या होत्या. दोन दिवस सुट्टी असल्याने मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी कर्जत तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणी सुरू होताच पावसाने जोरदार सुरुवात केल्याने सुमारे तीन तास उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधी तसेच पत्रकार यांना पावसात भिजत बाहेर ताटकळत उभे राहावे लागले. मतमोजणी कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात घेण्यात आली, त्या वेळी उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना खिडकीत उभे राहून पावसात छत्री घेऊन ताटकळत, भिजत आपले निकाल घ्यावे लागले. या वेळी प्रशासनाने उमेदवारांसाठी आसन व्यवस्था करणे गरजेचे होते; परंतु कोणतीही उपाययोजना केली नसल्याने उमेदवारांनी निवडणूक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.