- सिकंदर अनवारे। लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाड शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या तक्रारी निवारण्यासाठी महाडमध्ये महावितरणचे कर्मचारी कमी पडत आहेत. मागील महिन्यात बदलून गेलेले कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि यापूर्वीची रिक्त पदे यामुळे सुमारे ६१ कर्मचाऱ्यांची तूट महाड तालुक्यात निर्माण झाली आहे. याचा फटका कर्मचाऱ्यांवर अधिक कामाचा भार पडण्यात आणि वारंवार विजेचा लपंडाव सुरू राहण्यावर झाला आहे.वीज वितरण कंपनीच्या महाड उपविभागात महाड शहर, महाड ग्रामीण, बिरवाडी, एमआयडीसी, नाते, वाहूर, कुंभले, विन्हेरे ही आठ शाखा कार्यालये येतात. प्रत्येक शाखा कार्यालयामध्ये ५० टक्क्यापेक्षा अधिक कर्मचारी पदे रिक्त आहेत. पावसाच्या कमी जास्त प्रमाणामुळे तसेच वारा आणि विजेच्या धक्क्यांमुळे तांत्रिक बिघाड होत आहेत. संपूर्ण तालुक्यात वीज वाहक तारांचे जाळे पसरल्यामुळे एखाद्या छोट्याशा बिघाडासाठी एक अखंड शाखा कार्यालय अंतर्गत येणारा विभाग काळोखात जात आहे. या बिघाड दुरुस्तीसाठी नैसर्गिक अडचणीसोबत महावितरण निर्मित कर्मचारी तुटवड्याची अडचण येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण भागात डोंगर आणि जंगल भागातून विजेच्या तारा खेचल्या गेल्यामुळे कर्मचारी तुटवड्याचा त्रास अधिक प्रमाणात जाणवत आहे.गेल्या वर्षभरापासून कर्मचारी तुटवडा असताना मे महिन्यामध्ये ५ कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर २२ कर्मचारी आपल्या गावी बदली करून परत गेले. नागपूर, भंडारा आदि विभागातून आलेले हे कर्मचारी नोकरी मिळण्याकरिता कोकण विभागात येतात आणि नियमाप्रमाणे तीन वर्षे पूर्ण करून पुन्हा आपल्या गावी परत जातात. यामुळे कोकणातील कर्मचारी तुटवडा कायमच राहतो. याचा फटका थेट ग्राहकांना बसत असून याची दखल महावितरणने घ्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. महाड महावितरण उपविभागांतर्गत १५० गावे येत असून सुमारे ५२ हजार ४०५ वीज ग्राहक आहेत. या गावातून वितरीत होणाऱ्या विजेपोटी ९० टक्के बिल वसुली होत असून चोरी आणि गळतीचे प्रमाण कमी आहे. ही बाब लक्षात घेता महावितरणने येथे पुरेसा कर्मचारीवर्ग देणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याने ग्राहकांना सध्याच्या परिस्थितीत तासन्तास अंधारात रहावे लागत असल्याने वीज वितरण कंपनीबाबत संताप व्यक्त होत आहे.- सध्याची परिस्थिती पाहिली तर महाड महावितरण उपविभागांतर्गत महाड शहर, महाड ग्रामीण, बिरवाडी, एमआयडीसी, नाते, वहूर, कुंभले विन्हेरे अशा आठ शाखा असून १५० गावांचा समावेश आहे, तर ५२ हजार ४०५ वीज ग्राहक आहेत. या आठ शाखांमध्ये १०९ कर्मचाऱ्यांची गरज आहे. असे असताना ६१ पदे रिक्त आहेत. नागरिकांना बसतोय फटका३१ मे रोजी महाड तालुक्यात अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्या दिवशीपासून आजपर्यंत रात्री अपरात्री दिवसा कधीही वीज खंडित होण्याचे, काही न काही बिघाड होणे प्रकार सुरूच आहेत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांची कमतरता हा फटका मात्र थेट ग्राहकांना बसत आहे. तरी वरिष्ठ कार्यालयाने कर्मचारी समस्येकडे तातडीने लक्ष घालून रिक्त पदे भरून समस्या दूर करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.पावसाळा सुरू झाल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होत असून वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून यामुळे लहान मोठा व्यवसाय करणाऱ्यांवर देखील याचा परिणाम होत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.गेली वर्षभर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेले आहे. - जी. एस. जाधव, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, महावितरण महाड उपविभाग.
वीज कर्मचाऱ्यांची कमतरता
By admin | Published: June 17, 2017 1:56 AM