खालापूर तालुका आरोग्य केंद्रात सर्पदंश लसीचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 04:13 AM2019-07-04T04:13:01+5:302019-07-04T04:13:12+5:30
मोहोपाडा : खालापूर तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून आरोग्य केंद्रात सर्पदंशाच्या उपचारासाठी लसच उपलब्ध नाही. त्यामुळे चंद्रकांत बबन ...
मोहोपाडा : खालापूर तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून आरोग्य केंद्रात सर्पदंशाच्या उपचारासाठी लसच उपलब्ध नाही. त्यामुळे चंद्रकांत बबन पवार (१८, रा. खालापूर) याला चौक ग्रामीण रूग्णालयात हलविण्याची वेळ आली. खालापूर आरोग्य केंद्राची रूग्णवाहिकाही पंक्चर असल्याने अखेर दुचाकीवरून चंद्रकांतला चौक येथे नेण्याची वेळ आले.
खालापूर येथील चंद्रकांत पवार याच्या पायाला मंगळवारी सकाळी हिरवा घोणस हा विषारी साप चावला. चंद्रकांतला तातडीने खालापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु आरोग्य केंद्रात सर्पदंश प्रतिबंधक लसच उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी टीटीचे इंजेक्शन देत पुढील उपचारासाठी दहा किमीवर चौक ग्रामीण रूग्णालयात जाण्यास सांगितले. यावेळी रूग्णवाहिकेची मागणी केल्यावर रूग्णवाहिकेचा टायर पंक्चर असल्याचे सांगण्यात आले. टायर बदलण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा जीव वाचविण्यासाठी चंद्रकांतला दुचाकीवरून चौक येथे नेण्यात आले.
तालुक्यातील बहुतांश लोकवस्ती ग्रामीण, दुर्गम भागात असून पावसाळ्यात सर्पदंश, विंचूदंश सारख्या घटनांमध्ये वाढ होते. आरोग्य केंद्रात सर्पदंश प्रतिबंध लस नसल्याने नागरिक संतप्त असून रुग्णालयाचा गलथान कारभार न सुधारल्यास मोर्चा काढणार असल्याचे खालापूरचे कैलास पवार यांनी सांगितले.
खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश प्रतिबंधक लस (एएसव्ही)नसल्याने टीटी इंजेक्शन देवून चौक येथे रूग्णाला नेण्यास सांगातले. रूग्णवाहिका पंक्चर असल्याने एकशे आठला कॉल केला होता, परंतु तोपर्यंत रूग्णाला दुचाकीवरून नेले.
- ङॉ.अनिलकुमार शाह, वैद्यकीय अधिकारी, खालापूर आरोग्य केंद्र