मधुकर ठाकूर।लोकमत न्यूज नेटवर्कउरण : जेएनपीटीचे आरोग्य विभाग आणि उरण तहसीलदारांनी वारंवार आवाहन करूनही कोविड सेंटरमध्ये रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी एकाही एमबीबीएस डॉक्टरांनी येण्याची तयारी दाखविलेली नाही. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार नर्स, वॉर्डबॉय, अन्य कर्मचारीही येण्यास राजी नाहीत. यामुळे उरण, जेएनपीटीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेली तीनही कोविड सेंटर उपचारासाठी कुचकामी ठरू लागली आहेत. मात्र यामुळे दिवसेंदिवस रुग्णांना आवश्यक उपचार मिळणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेच्या वातावरणाबरोबरच शासकीय कारभाराबाबत संतापही व्यक्त केला जात आहे.देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. उरण तालुकाही यास अपवाद नाही. वाढत्या औद्यौगिकीकरणामुळे अल्पावधीतच देशाची दुसरी आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाºया उरण परिसरालाही कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. उरण परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांवर उरणमध्येच उपचारासाठी तीन कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. यामध्ये बोकडवीरा येथील केअर पॉइंट सेंटरमधील ४० बेडचे कोविड केअर सेंटर, जेएनपीटी ट्रॉमा सेंटरमधील १६ बेडचे डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटर आणि बोकडवीरा येथील सिडकोच्या प्रशिक्षण केंद्रात जेएनपीटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले १२० बेडचे कोविड केअर सेंटर या तीन कोविड केअर सेंटरचा समावेश आहे. यापैकी ४० बेडच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची जबाबदारी उरण येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र या कोविड केअर सेंटरमध्ये अनेक सुविधांची वानवा आहे. या सेंटरमध्ये डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आदी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तसेच सेंटरमध्ये एमबीबीएस डॉक्टरच उपलब्ध नसल्याने सध्या खासगी आयुर्वेदिक डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या सेंटरमध्ये २५ ते ३० बेडसाठी आॅक्सिजनची व्यवस्था असतानाही डॉक्टरांअभावी रुग्णांना मात्र उपचारासाठी नवी मुंबई, पनवेल येथे पाठविण्याची वेळ प्रशासनावर येते. आता कोविड केअर सेंटर अद्ययावत करण्यात येत आहे. सध्या उपलब्ध असलेले ४ खासगी डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्याचे काम करीत आहेत. रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी या कोविड सेंटरमध्ये आठ एमबीबीएस डॉक्टर, १० नर्सेस आणि वॉर्डबॉय आदी कर्मचाºयांची तातडीने आवश्यकता आहे. याची माहिती तहसीलदारांसह संबंधित विभागाच्या अधिकाºयांना देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी दिली.खासगी डॉक्टरांचा काम करण्यास नकार : या तीनही कोविड केअर सेंटरमध्ये किमान १५ एमबीबीएस डॉक्टर्स, २५ नर्सेस, वॉर्डबॉय आदी कर्मचाºयांची गरज आहे. मात्र गरीब गरजू रुग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेला एकही एमबीबीएस डॉक्टर कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी तयार नाही. याबाबत खासगी डॉक्टरांकडून माहिती घेतली असता कोविड सेंटरमध्ये काम करणे म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारखे आहे. दरमहा आठ-दहा लाख रुपये कमविणारे एमबीबीएस डॉक्टर्स दरमहा एक लाख रुपये इतक्या अत्यंत कमी मोबदल्यात काम करण्यास कसे काय येतील? अशी खोचक प्रतिक्रिया काही खासगी डॉक्टरांनी व्यक्त केली.बोकडवीरात हवेत १० एमबीबीएस डॉक्टर, १० नर्स, वॉर्डबॉयबोकडवीरा येथील सिडकोच्या प्रशिक्षण केंद्रात जेएनपीटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या १२० बेडच्या कोविड केअर सेंटरची जबाबदारी उरण तालुका आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे सांभाळत आहेत.या कोविड केअर सेंटरमध्येही मोठ्या प्रमाणात एमबीबीएस डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आदी कर्मचाºयांची कमतरता आहे.या सेंटरमध्येही कोविड रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी १० एमबीबीएस डॉक्टर्स, १० नर्सेस, वॉर्डबॉय आदी कर्मचाºयांची तातडीने आवश्यकता आहे.याबाबत वरिष्ठांकडे मागणी करण्यात आल्यानंतरही अद्यापही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे अवघड होऊन बसले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांनी दिली.जेएनपीटी ट्रॉमा सेंटरमध्ये फिजिशियन, फिजिओथेरपी, तीन एमबीबीएस डॉक्टरची गरजजेएनपीटी ट्रॉमा सेंटरमधील सध्या उपलब्ध असलेल्या १६ बेडचे डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरचा सर्व कार्यभार जेएनपीटीचे डेप्युटी सीएमओ डॉ. राज हिंगोरानी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उरण तालुक्यातील दुसºया स्टेजमधील कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ४८ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सध्या तरी किमान २४ बेडसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच कामकाज सुरू करण्यात आले आहे.या २४ बेडसाठी आॅक्सिजनची व्यवस्था करण्याचेही काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी १६ बेडसाठी आॅक्सिजनची व्यवस्था झालेली असल्याने सध्या सर्वच आॅक्सिजनचे बेड रुग्णांनी भरलेले आहेत. मात्र जेएनपीटीच्या डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटरमध्येही मोठ्या प्रमाणात एमबीबीएस डॉक्टर्स, नर्सेसची उणीव भासू लागली आहे. कोविड रुग्णांसाठी एक फिजिशियन, फिजिओथेरपी, तीन एमबीबीएस डॉक्टर आणि नर्सेसची नितांत गरज आहे.यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून फिजिशियन, फिजिओथेरपी, तीन एमबीबीएस डॉक्टर्स आणि नर्सेससाठी आवाहनही करण्यात आले आहे. मात्र तहसीलदार आणि जेएनपीटीच्या आवाहनाला अद्यापही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती जेएनपीटीचे डेप्युटी सीएमओ डॉ. राज हिंगोरानी यांनी दिली.
कोविड सेंटरमध्ये डॉक्टरसह कर्मचाऱ्यांची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:43 AM