लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना विधानसभा निवडणुकीची चाचणी परीक्षा सोडविण्याचा हा एक भाग आहे यात शंकाच नाही पण, विधानसभा निवडणुकीचा मुख्य उद्देश नाही. चाचपणीसाठी पक्षाच्या विविध यंत्रणा कार्यान्वित आहेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा पुष्प दुसरे कार्यक्रम सोहळा अलिबागमध्ये गुरुवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या गोरे उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यात अनेक भागातील रस्त्यांवर खड्डे पडले असून ते भरण्यास शासनाकडे पैसे नाहीत आणि त्यानंतरही सरकार योजना लागू करीत आहे, असा मुद्दा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. याबाबत गोऱ्हे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले की राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. शासन कोणतेही निर्णय हा जबाबदारीने घेत असते. केंद्र सरकारनेही काही निधी राज्य सरकारला दिला आहे. खड्ड्यांचे बोलाल तर मला सुद्धा या खड्ड्यांचा अनुभव आला आहे. आम्ही ते मोजले असून फोटोही काढले आहेत. ज्या ठेकेदारांना खड्डे भरण्याची जबाबदारी दिली आहे ती सरकार पूर्ण करून घेईल. योजनेसाठी निधी कुठून येईल याबाबत नागरिकांना माहिती दिली असल्याचे गोऱ्हे यांनी म्हटले.