जोगेश्वरी मंदिरासमोरील तलाव झाला गाळमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:55 PM2019-05-30T23:55:21+5:302019-05-30T23:55:31+5:30
नागोठणेत ग्रामपंचायतीची स्वच्छता मोहीम : पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा मानस
नागोठणे : गावातील जोगेश्वरी मंदिरासमोरील तलावातील माती, शेवाळ तसेच कचरा काढण्याच्या कामाला ग्रामपंचायतीने सुरुवात केली आहे. जोगेश्वरी मंदिरासमोर दोन तलाव असून त्यातील एक स्वच्छ असला, तरी दुसरा तलाव अस्वच्छ तसेच गाळाने भरला होता. त्यामुळे मंदिर परिसरातील सुशोभीकरणात बाधा येत होती. हा परिसर स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आल्यावर ग्रामपंचायतीकडून तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
तलावातील दूषित पाणी उपसून गाळ, शेवाळ तसेच कचरा बाहेर काढण्यात आला आहे. याच तलावात दरवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. तलावात शेवाळ साचल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे. सध्या गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाळ्यापूर्वी गाळउपसा पूर्ण होईल, असा विश्वास सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी व्यक्त केला.