रायगडमधील लाखमोलाच्या दहीहंडी स्पर्धा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 05:30 AM2020-08-05T05:30:13+5:302020-08-05T05:30:28+5:30
कोरोना महामारीमुळे आयोजकांचा निर्णय : दहीकाला उत्सवात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे कठीण
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या आणि लाखमोलाच समजल्या जाणाऱ्या दहीहंडी स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याचे स्वास्थ्य बिघडले असताना, दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून गोविंदांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधून दहीहंडी स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
देशभरात अनलॉक होत असताना, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अनिवार्य करण्यात आले आहे, तसेच सामाजिक कार्यक्र म, धार्मिक सण, सांस्कृतिक कार्यक्र म आयोजनावर अद्यापही बंदी आहे. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव होणार की नाही, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. त्याच दरम्यान, आता जिल्ह्याच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाºया दहीहंडी स्पर्धांचे आयोजन करणाºया मंडळांनी आपल्या दहीहंडी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करणाऱ्यांनी घेतला आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ असं म्हणत दहीहंडी स्पर्धा आयोजकांनी रद्द केल्या आहेत. करोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे हा एकमेव पर्याय आहे. अशा वेळी दहीहंडीसारख्या मानवी मनोºयांचा खेळ कसा खेळणार, शासनाच्या सूचना असताना, गोविंदांची एकत्र येण्याची जबाबदारी कशी घेणार, असे अनेक प्रश्न उभे राहिल्याने हा उत्सव अगदी साधेपणाने रायगडात करण्यात येणार आहे, तसेच या खेळाचे आयोजन केल्यास पोलीस यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे, पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी जिल्ह्यातील दहीहंडी आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे.
‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत दरवर्षी कोकणासह महाराष्ट्रातील विविध शहरांत गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्यातील अलिबाग, पेण, कर्जत, माणगाव, रोहा, महाड आदी ठिकाणी मानाच्या दहीहंडी बांधण्यात येतात, या हंड्या फोडण्यासाठी विविध ठिकाणांहून दहीहंडी पथके येत असतात.परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत, हा निर्णय घेतला आहे.
या दहीहंडी रद्द : दहीहंडी उत्सवात सोशल डिस्टन्सिंग, मास्क बांधणे अशा नियमांचे पालन करण्यात अडचणी येणार आहेत, हे सर्व लक्षात घेत यंदाचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही काही महत्त्वाच्या मंडळांनी यंदा उत्सव साजरा न करण्याचे जाहीर केले आहे. अलिबाग शहरातील प्रशांत नाईक मित्रमंडळाची, भारतीय जनता पार्टी, तसेच शिवसेनेची होणारी मानाची हंडी रद्द करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील नितीन सावंत मित्रमंडळ व सुनील गोगटे मित्रमंडळाची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. याबरोबरच पेण रोहा माणगाव तालुक्यातील ही छोट्या-मोठ्या दहीहंडी रद्द करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूची महामारी सुरू असताना, या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी दहीहंडीसारखा मानाचा समजाला जाणारा उत्सव या वर्षी आम्ही रद्द केला आहे, तसेच नागरिकांना कोरोनाविरहित जीवन जगता यावे, अशी प्रार्थना श्रीकृष्णाजवळ केली आहे. - अॅड.महेश मोहिते, जिल्हाध्यक्ष, भाजप