सिलिंडर स्फोटात लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:09 AM2018-12-02T01:09:12+5:302018-12-02T01:09:16+5:30
मुरुड चिखलपाखाडी येथील रहिवासी अजित जोशी यांच्या घरात शुक्रवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आजूबाजूच्या घरांचेही लाखो रुपयांचे नुकसान होऊन नऊ जण गंभीर जखमी झाले.
- गणेश चोडणेकर
आगरदांडा : मुरुड चिखलपाखाडी येथील रहिवासी अजित जोशी यांच्या घरात शुक्रवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आजूबाजूच्या घरांचेही लाखो रुपयांचे नुकसान होऊन नऊ जण गंभीर जखमी झाले. स्फोटाची माहिती मिळताच, मुरुडचे पोलीस निरीक्षक किशोर साळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नऊ जखमींना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
नगरपालिकेच्या अग्निशमन पथक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने स्फोट झालेल्या घरावर पाणी मारून आग आटोक्यात आणण्यात आली; परंतु स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या घरांचे पत्रे उडाले, कौलांचे नुकसान झाले आणि भिंतींनाही तडे जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले.
चिखलपाखाडीतील आदिती जोशी रात्री जेवण बनवत असताना सिलिंडर संपला म्हणून त्यांनी दुसरा सिलिंडर लावण्यास घेतला, सील तोडले असता गॅस गळती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गळती कशी थांबवावी, हे लक्षात न आल्याने सिलिंडरचा स्फोट झाला आणि तो देवघरात फेकला गेला. यातून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर येऊ लागल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये शॉकसर्कि ट होऊन आग लागली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, शेजारी उदय साठे, जयंत शेडगे व शशिकांत गुरव यांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले. स्फोटात प्रथमेश जोशी ( २९), मुबीन खान (३५), मुस्तफा खान (४), आदिती जोशी (५०), शबाना खान (३०), मंगेश जोशी (२६), समिधा उपाध्ये-शेजारी (२४) , मुस्तकीम खान (८), मनीषा मेश्राम (२७), ऋ ता मेश्राम (४) आदी जखमी झाले आहेत. यात आदिती जोशी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
>अधिका-यांनी घेतली रुग्णांची भेट
स्फोटातील जखमींना योग्य ती भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन या वेळी भानू मोहन यांनी दिले. तर मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून योग्य ती भरपाई देण्यात येईल, असे सांगितले.
शनिवारी सकाळी एचपी गॅस मुंबई येथून सेल्फ आॅफिसर- भानू मोहन यांनी घटनास्थळी पाहणी केली, तसेच स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांचीही रुग्णालयात भेट घेतली.
या वेळी मुरुड नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे, महेश भगत व त्यांचे सहकारी, नगरसेवक मंगेश दांडेकर, आशिष दिवेकर, नयन कर्णिक, प्रवीण बैकर, नाना गुरव, श्रीकांत सुर्वे आदी उपस्थित होते.