दिव्यांच्या रोषणाईत लक्ष्मीपूजन, झेंडूच्या फुलांच्या तोरणमाळा अन् सप्तरंगी रांगोळ्यांनी सजले अंगण
By निखिल म्हात्रे | Published: November 12, 2023 08:48 PM2023-11-12T20:48:49+5:302023-11-12T20:51:22+5:30
घरोघरी आणि दुकानात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले.
अलिबाग - झेंडूच्या फुलांच्या तोरणमाळा, सप्तरंगी रांगोळ्यांनी सजलेले अंगण आणि लक्ष लक्ष दिव्यांच्या झगमगाटात व फटाक्यांच्या आतषबाजीत रविवारी सायंकाळी मुहूर्तावर शहरासह जिल्ह्यात लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. यासह व्यापाऱ्यांनी चोपडी पूजन केले. दिवाळीच्या दिवशीही सायंकाळपर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. घरोघरी आणि दुकानात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले.
रविवारी सायंकाळी सहा ते रात्री 8.33 पर्यंत लक्ष्मीपूजन नागरिकांनी केले. मंदीचे संकट दूर होत समृद्धी येऊ दे, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. दुकानांच्या व्यवहारासाठी असलेल्या नव्या हिशेब वही खात्यांचे (चोपड्यांचे) पूजन करण्यात आले. मिणमिणत्या पणत्या, रांगोळ्या व फुलांच्या सुगंधात शहर आणि परिसरात लक्ष्मीपूजन सोहळा मंगलमय वातावरणात उत्साहात झाला. लक्ष्मीपूजन असल्याने पहाटेपासूनच वातावरणात मांगल्य आणि उत्साहाचा सुगंध दरवळत होता. घरासमोर सडा टाकत आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या. लक्ष्मीपूजन व नागरिकांनी लक्ष्मीची चित्र असलेली लाल रंगाच्या वहीचे पूजन केले. त्यानंतर व्यापारी, तसेच नागरिकांनी हरित फटाके फोडले. फटाक्यांच्या आतषबाजीने सारा आसमंत प्रकाशमय झाला होता. खरेदीसाठी गर्दी लक्ष्मीपूजनासाठी लागणारी झेंडूची फुले, केरसुणी, तसेच नैवेद्यासाठी मिठाई, लाह्या बत्तासे, पूजेसाठी लागणारे वेगवेगळे वाण खरेदीसाठी कालपासूनच ग्राहकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती.
लक्ष्मी पूजनाच्या तयारीसाठी महिलांनी घरासमोरील मोकळ्या जागेत आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. लक्ष्मीपूजनात केरसुणी पूजेला महत्त्व आहे. त्यासाठी नवीन आणलेली केरसुणी पूजेसाठी ठेवण्यात आली होती. मंगल कलश, लक्ष्मीची प्रतिमा व त्यापुढे केरसुणी ठेवण्यात आलेली होती. झेंडूच्या फुलांच्या माळा व आकर्षक रोषणाईमुळे परिसरात मंगलमय वातावरण तयार झाले होते. व्यापाऱ्यांनी गादी मुर्हुतावर सरस्वती, लक्ष्मी पूजन, कुबरेची पूजा केली. पारंपरिक पद्धतीने अमावस्येच्या दिवशी येणारे फल लक्ष्मी आणि स्थिर लक्ष्मी राहावी यासाठी पूजा करण्यात येते. पुजेच्या वेळी दाग-दागिणे ठेऊन त्यांची पुजन केले.