लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : आरोपी हे लोकप्रियता मिळावी म्हणून जाणीवपूर्वक कुणाला तरी बदनाम करण्याकरिता तसेच आपल्याला सहानुभूती मिळावी, यासाठी आरोप करत असतात. मात्र, असले प्रकार राज्य सरकारला नवीन नाहीत. देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत आणि राज्याच्या पोलिस दलाचे अभिनंदन करायला पाहिजे, असे कार्य आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील यांनी केलेल्या आरोपांवरती व्यक्त केली.
रायगड लोकसभा आढावा बैठक आणि महाविजय २०२४ अभियानांतर्गत अलिबागमध्ये बावनकुळे बुधवारी आले होते. यावेळी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाबाबत बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीवरही ताशेरे ओढले. आघाडीच्या काळात अनेक गंभीर गुन्हे घडले. मात्र, गुन्हा उघडकीस न आणता आरोपीला पकडले जात नव्हते. गुन्हा उघडकीस आणला तर त्याला शिक्षा होईल, असे काही करायचे नाही, असे सुरू होते, अशी टीका बावनकुळे यांनी केली. आताचे सरकार हे कामाचे असून गुन्हेगारीवर अंकुश ठेवणारे आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणाची गय करणारे नाहीत, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
‘पंतप्रधान राहुल गांधी होणार’मुळे पंचाईतशहरात भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची महाविजय संकल्प यात्रा निघाली होती. बावनकुळे हे दुकानदार, ग्राहक यांच्याशी संवाद साधून पंतप्रधानपदी तुम्हाला कोण आवडेल, असे विचारत होते. अनेकांनी नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. मात्र, एका दुकानदाराने प्रदेशाध्यक्षांची चांगलीच पंचाईत केली. बावनकुळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी आवडतील, असे स्पष्ट उत्तर दिले. त्यामुळे काहीसे भांबावलेले बावनकुळे यांनी साडेचारशेपैकी एकाने राहुल गांधी यांचे नाव घेतले. काही हरकत नाही, असे बोलून वेळ मारून नेली.