नांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यातील सावली ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी सावली ग्रामपंचायत कार्यालयात झाली. निवडणूक अधिकारी म्हणून रमेश म्हात्रे यांनी कामकाज पाहिले. सरपंचपदासाठी राष्ट्रवादीच्या मंदा ठाकूर यांनी अर्ज दाखल केला होता. तर शेतकरी कामगार पक्षाकडून ललिता कर्जेकर यांनी अर्ज दाखल करून उत्कृष्ट मोर्चेबांधणी केली होती. या मैत्रीपूर्ण लढतीत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार ललिता कर्जेकर यांना पाच सदस्यांची मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार मंदा ठाकूर यांना फक्त तीन मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकारी रमेश म्हात्रे यांनी सावली सरपंच म्हणून ललिता कर्जेकर यांचे नाव घोषित केले.मुरु ड तालुक्यात राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षाची युती होती, परंतु येथे मात्र ही लढत मैत्रीपूर्ण लढली गेली. सावली ग्रामपंचायतीच्या सरपंच मंदा ठाकूर यांच्यावर तेथील सदस्यांनी अविश्वास ठराव सहमत केला होता, त्यामुळे मंदा ठाकूर यांना सरपंचपद गमवावे लागले होते. रिक्त असलेल्या सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली, त्याप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. ही निवड जाहीर होताच जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार यांनी सरपंच ललिता कर्जेकर यांना पुष्पमालिका देऊन अभिनंदन केले. सावली ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषदेमधून आवश्यक तो निधी आणून विकास करण्यास आम्ही सर्व कटिबद्ध असल्याचे सांगितले, तर नवनिर्वाचित सरपंच ललिता कर्जेकर यांनी ग्रामपंचायतीमधील सर्व ग्रामस्थ व स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन विकासकामे करण्याचे अभिवाचन दिले. या वेळी कमलाकर भाने, तुकाराम पाटील, अजित कासार, भरत महादान, धर्मा पोटदुखे आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
सावली सरपंचपदी ललिता कर्जेकर
By admin | Published: April 01, 2017 6:20 AM