अलिबाग : वेदांत फॉक्सकोन कंपनी गुजरातमध्ये गेल्यानंतर मुरुड रोहा तालुक्यात येणारा बल्क औषध निर्मित प्रकल्प ही रायगडमधून जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अशी कोणतीही शक्यता नसल्याचे प्रशासन कडून स्पष्ट केले आहे. बल्क औषध निर्मित प्रकल्प साठी जमीन भूसंपादन प्रक्रिया एमआयडीसी साठी प्रशासनातर्फे सुरू आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुरुड रोहा तालुक्यातच होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र मुरुड तालुक्यातील शेतकऱ्याचा या प्रकल्पाला विरोध कायम आहे. प्रशासनतर्फे सरकारी संयुक्त जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना नोटीस काढण्यात आलेल्या आहेत. या सक्तीच्या संयुक्त मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
मुरुडमधील दहा आणि रोहा तालुक्यातील सात अशा सतरा गावातील १ हजार ७१६ हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी प्रशासनाकडून भूसंपादीत केली जात आहे. भूसंपादन जागेवर बल्क औषध निर्मित प्रकल्प उभारला जाणार आहे. मुरुड तालुक्यातील दहा गावातील १०४९.६८६ हेक्टर खाजगी तर १६६.५५१ सरकारी अशी १२१६.२७ हेक्टर क्षेत्र भुसंपादीत केले जाणार आहे. रोहा तालुक्यातील सात गावातील ५०० हेक्टर क्षेत्र भूसंपादन होणार आहे.
बल्क औषध निर्मित हा केंद्र सरकारचा प्रस्तावित प्रकल्प आहे. हा प्रकल्प मुरुड रोहा येथे आणण्यासाठी तत्कालीन महा विकास आघाडी सरकारने केंद्राकडे प्रस्ताव सादर केला होता. एम आय डी सी मार्फत प्रकल्पासाठी प्रशासनामार्फत जमीन भूसंपादन करण्यास सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून येथील शेतकऱ्यांना भूसंपादन बाबत नोटीसही पाठविल्या होत्या. मात्र येथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध आहे. प्रशासनाने घेतलेली जनसुनावणी ही उधळून लावली होती. प्रकल्पाविरोधात मोठे आंदोलनही करण्यात आले होते.
मुरुड तालुक्यातील शेतकरी हे प्रकल्पाला आजही विरोध करीत असले तरी रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमीन मोजणीला विरोध केलेला नाही. त्यामुळे तेथील ५०० हेक्टर जमिनीची मोजणी करण्यात आलेली आहे. मुरुड तालुक्यातील दहा गावातील सरकारी जमीन मोजणीच्या नोटिसा शेतकऱ्यांना प्रशासनाने पाठविल्या आहेत. ही मोजणी सोमवारी २६ स्पटेंबर रोजी होणार आहे. मात्र या संयुक्त मोजणीला मुरुड मधील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी भाजप माजी जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते याच्या नेतृत्वाखाली अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे याना निवेदन दिले आहे.
बल्क औषध निर्मित प्रकल्प अजूनही रायगडातमुरुड, रोहा येथील बल्क औषध निर्मित प्रकल्प हा बाहेरच्या राज्यात जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र प्रकल्प गुंडाळण्याबाबत कोणतीही सूचना राज्य सरकारकडून प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. एम आय डी सी साठी प्रशासनाकडून जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बल्क औषध निर्मित प्रकल्प हा जिल्ह्यातच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रोहा मुरुड तालुक्यात एमआयडीसी साठी जमीन भूसंपादन केले जात आहे. मुरुड तालुक्यातील १६६ हेक्टर शासकीय जमिनीची संयुक्त मोजणी साठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवली आहे. २६ सप्टेंबर रोजी ही मोजणी राणे कन्सल्टंट या खाजगी कंपनी मार्फत केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी या मोजणीला आक्षेप घेतल्याने निवेदन दिले आहे.प्रशांत ढगे, प्रांताधिकारी, अलिबाग