पाली : सुधागड तालुक्यातील ताडगाव येथील कोटबेवाडी आदिवासीवाडीजवळ रविवार, ४ आॅगस्टच्या पहाटे ३ च्या सुमारास मोठे भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खचून जमिनीला लांब व रुंद भेगा आणि खड्डे पडले आहेत. या वेळी परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मंगळवारी पाली-सुधागड तहसीलदारांनी घटनास्थळाची पाहणी करून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला आहे.सध्याच्या अतिवृष्टीमुळे कोटबेवाडी आदिवासीवाडीपासून १०० कि.मी.च्या अंतरावर उत्तरेकडे माळरान जमीन दबल्यामुळे जमिनीच्या उताराच्या ठिकाणी सुमारे ९० मीटर लांब, तर दुसरी ४० मीटर लांब, १५ मीटर रुंदीची व दहा मीटर खोल भेग व इतरही अनेक छोट्या-मोठ्या भेगा आणि खड्डे पडले आहेत. या वेळी वृक्षही उन्मळून पडले आहेत, असा मोठा प्रकार घडल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना असावी.या घटनेमुळे ताडगाव ग्रामस्थ व आदिवासीवाडीतील लोक भयभीत झाले आहेत. ताडगाव, कोटबेवाडी येथील ग्रामस्थ आणि मोहावाडीतील तरुणांनी रात्री जमीन हादरल्यासारखी झाली व आवाज आला असे सांगितले. काहींना हा भूकंप झाल्याचे वाटत आहे. तहसीलदार दिलीप रायन्नावार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच छब्या जाधव यांच्यासह केतन साठे, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश साठे आदीनी घटनास्थळी भेट दिली.तहसीलदारांचा अहवालसध्याच्या अतिवृष्टीमुळे सुधागड तालुक्यातील करंजाई (चिखलगाव), पेंढारमाळ (घोटवडे), हरनेरी, चेरफळवाडी (उद्धर), ढोकळेवाडी (खंडपोली) आणि भालगुल या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे तालुक्यातील जमिनीचे सखोल सर्वेक्षण भूगर्भ शास्त्रज्ञांकडून व्हावे, अशी मागणी तहसीलदारांनी अहवालात केली.त्या रात्री एकदम वेगळा आवाज झाला. जमीन व घर हादरल्यासारखी झाली. घरातील मंडळी झोपेतून उठून बसली. काय झाले कळायला मार्ग नव्हता. वीज पडली असावी, असे वाटले आणि एवढ्या रात्री कोणाला उठवणार त्यामुळे उजाडल्यावर पाहण्यास गेलो. या घटनेने लोक खूप घाबरले आहेत.- प्रकाश साठे, ग्रामस्थ, ताडगावशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे. तसेच येथील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे पुनर्वसनही केले पाहिजे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी ताबडतोब दखल घेत घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना योग्य सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार.- राकेश साठे, तंटामुक्ती अध्यक्ष, ताडगावया लोकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, सध्या तरी स्थलांतर करण्याची आवश्यकता वाटत नाही. दरड कोसळण्याच्या घटना पाहता तालुक्यातील जमिनीचे सखोल सर्वेक्षण भूगर्भ शास्त्रज्ञांकडून व्हावे, ताडगावचे सर्वेक्षण तत्काळ व्हावे, अशी मागणी केली आहे.- दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली
कोटबेवाडी आदिवासीवाडीजवळ भूस्खलन; ग्रामस्थ भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:41 PM