आगरदांडा : ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा जगात प्रसिद्ध असून, हा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातील शेकडो पर्यटक मोठ्या प्रमाणात किल्ला पाहण्यासाठी येत असतात. परंतु या किल्ल्यास कोणतीही सुरक्षा नव्हती. या किल्ल्यावर पोलीस संरक्षण नव्हते. त्यामुळे सर्वांना मुक्त संचार होता. याबद्दल नुकतेच ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत या किल्ल्यास संरक्षण देण्यात आले आहे.किल्ल्यास संरक्षण नसल्याने आणि येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही तपासणी होत नसल्याने मुक्त संचार होता. त्यामुळे अतिरेकी येथील पर्यटकांना ओलीस ठेवून देशविघातक कृत्ये करू शकतात, असा पोलीस यंत्रणेचा गुप्त अहवाल असल्याचे सांगण्यात आले होते. या बातमीची दखल पोलीस यंत्रणेकडून घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. सशस्त्र पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. कधीही पोलिसांचा वावर नसणारा किल्ला आता पोलिसांच्या संरक्षणामुळे गजबजून गेला आहे.जंजिरा किल्ला बघण्यासाठी शनिवारी -रविवारी देशविदेशातील दहा हजारांपेक्षा जास्त पर्यटक येत असतात. नेहमी गर्दी असणारा हा किल्ला आहे. त्यामुळे संरक्षणासाठी सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाचे जवान व स्थानिक पोलिसांकडून या ठिकाणी गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. येणाऱ्या पर्यटकांना कोणताही धोका पोहोचू नये, सर्व पर्यटक भयमुक्त राहावेत, यासाठी पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे.
येणाऱ्या - जाणाऱ्यांची कसून तपासणीकिल्ला जेट्टीजवळ रोजच पोलीस बंदोबस्त असतो. पर्यटकांची कसून तपासणीही केली जाते. सध्या किल्ल्यात एक रायफलधारी पोलीस व महिला पोलीस, होमगार्ड असा बंदोबस्त असतो. राजपुरी जेट्टीजवळ एक पोलीस व महिला पोलीस, खोराबंदर एक पोलीस असा बंदोबस्त रोजच असतो, तसेच शनिवारी व रविवारच्या वेळी पर्यटकांची संख्या जास्त असते, त्याचा अंदाज घेऊन पोलीस बंदोबस्तात वाढही केली जाते, तरी येणाऱ्या पर्यटकांनी तपासणी वेळेत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केले. तसेच कुठेही संशयित व्यक्ती किंवा संशयित वस्तू दिसल्यास बोट मालक-चालक व स्थानिक नागरिकांनी त्वरित पोलीस ठाण्यात कळवावे, असे आवाहनही केले.