वाळीत टाकलेल्या 80 कुटुंबांना न्याय मिळणार, खटल्यात आज शेवटचा युक्तिवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 06:22 AM2019-02-18T06:22:48+5:302019-02-18T06:23:04+5:30
आज सुनावणी : अंतिम युक्तिवादापर्यंत पोहोचलेला महाराष्ट्रातील पहिलाच खटला
अलिबाग : आगरी समाजातील जातपंचायतीने शहाबाज येथील ८० कुटुंबीयांना वाळीत टाकले होते़ या प्रकरणी स्थानिक जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात अंतिम युक्तिवाद सुरू झाला आहे़ अंतिम युक्तिवादाच्या स्तरापर्यंत पोहोचलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच खटला असल्याने या खटल्यातील निकालावर राज्यातील इतर अनेक वाळीत टाकलेल्या लोकांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे़ त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी एल. जी. पाच्छे यांच्या समोर ८० वाळीतग्रस्त कुटुंबांच्या वतीने अॅड. सरोदे यांनी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला. तर आता सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी अॅड. प्रवीण ठाकूर आरोपींच्या वतीने युक्तिवाद करतील व त्यावर अॅड. सरोदे यांचा प्रतिवाद होऊन नंतर या प्रकरणात अंतिम निकाल अपेक्षित आहे़
या खटल्याची पार्श्वभूमी सांगताना अॅड. सरोदे म्हणाले, २०१३ मध्ये कमळपाडा वस्तीतील मधुकर पाटील (फिर्यादी) यांच्यासह ८० कुटुंबांना वाळीत टाकल्यामुळे जातपंचायतीतील सदस्यांविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जातीतून वाळीत टाकणे, समाजात असंतोष आणि द्वेष पसरवणे, गुन्हेगारी प्रकारचा कट रचून तेढ निर्माण करणे, अन्यायग्रस्तांना धमक्या देणे तसेच त्यांना मानसिक व शारीरिक इजा व संपत्ती नष्ट करण्याची धमकी देणे, अशा कलमांनुसार ११ आरोपींविरुद्ध तक्रार दिल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.