पाचाडमध्ये शिवसृष्टीसाठी जमिनीचे संपादन अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 02:43 AM2018-10-23T02:43:41+5:302018-10-23T02:43:46+5:30

रायगड किल्ल्याच्या संवर्धनांतर्गत महाड तालुक्यातील पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.

In the last phase of acquisition of land for Shivsirth in Panchad | पाचाडमध्ये शिवसृष्टीसाठी जमिनीचे संपादन अंतिम टप्प्यात

पाचाडमध्ये शिवसृष्टीसाठी जमिनीचे संपादन अंतिम टप्प्यात

Next

- आविष्कार देसाई 
अलिबाग : रायगड किल्ल्याच्या संवर्धनांतर्गत महाड तालुक्यातील पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. शिवसृष्टी उभारण्यासाठी ८७ एकर जमिनीची आवश्यकता आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला ५० एकर जमिनीचे संपादन करण्यात यश आले आहे. उर्वरित जमिनीचे संपादन लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
शिवसृष्टी ज्या जमिनीवर उभी केली जाणार आहे ती सर्व जमीन खासगी मालकीची आहे. शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकाच्या मनात आत्मीयता आहे. आपल्या राजाच्या शिवसृष्टीसाठी जमीन लागणार असल्याने कोणत्याच जमीन मालकाने आढेवेढे घेतले नाहीत. त्यामुळेच जमिनीचे संपादन करताना कोणतीच अडचण आली नसल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या या किल्ल्याला भारताच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. १६ व्या शतकातील या किल्ल्याला त्यांनी आपली राजधानी बनवली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याच किल्ल्यावर पार पडला आहे. इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्याची नासधूस केली होती. सध्या रायगड किल्ला महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडे संरक्षित आहे.
शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची गाथा सर्वदूर पसरावी यासाठी सरकारने येथे विविध सुविधा पुरवण्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे.
सुविधा पुरवल्याने येथे मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक येऊन तेथील स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. रायगड किल्ल्याचा विकास करताना या ठिकाणी शिवसृष्टीही उभारण्यात येणार आहे. शिवसृष्टीसाठी ८७ एकर जागेचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ८७ एकर जागेमध्ये सुमारे ४८ खोतदार आहेत. त्यांच्या जमिनी घेताना २०१३ चा भूसंपादन कायदा लागू करण्यात आला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. निवाडे जाहीर झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा आर्थिक मोबदला दिला जाणार आहे. आतापर्यंत ८७ एकरपैकी ५० एकर जमीन प्रशासनाने संपादित केली आहे. उर्वरित जमिनीचे संपादन लवकरच पूर्ण करून सदरची जमिनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती विठ्ठल इनामदार यांनी दिली. ८७ एकर जागेमधील सुमारे सात एकर जागा ही रस्त्यासाठी लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: In the last phase of acquisition of land for Shivsirth in Panchad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.