सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ, माजी नौदलप्रमुख अॅडमिरल एल. रामदास यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:30 AM2017-12-10T06:30:32+5:302017-12-10T06:30:37+5:30
प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल आदर्शाची कल्पना असते, जर आदर्श भारत बघायचा असेल, तर तो सैन्यात जाऊन बघावा. या जिल्ह्याला लढवय्या वीरांची मोठी परंपरा आहे. अशा लढवय्या वीरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते.
विशेष प्रतिनिधी / लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल आदर्शाची कल्पना असते, जर आदर्श भारत बघायचा असेल, तर तो सैन्यात जाऊन बघावा. या जिल्ह्याला लढवय्या वीरांची मोठी परंपरा आहे. अशा लढवय्या वीरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलन केले जाते. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने आणि नागरिकांनी हे स्वत:चे कर्तव्य समजून या राष्ट्रीय कार्यास सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
भारताचे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल एल. रामदास यांच्या विशेष उपस्थितीत, रायगड जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन निधी-२०१७ संकलन शुभारंभ कार्यक्रम शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाला. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, अलिबाग तहसीलदार प्रकाश सपकाळ, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, राज्य मार्ग परिवहन महामंडळ पेण विभाग नियंत्रक विजय नवनाथ गिते, तसेच जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि माजी सैनिक आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी माजी नौदलप्रमुख अॅडमिरल एल. रामदास यांचे स्वागत केले.
गतवर्षभरात जिल्ह्यातील ५५६ लाभार्थींना निधीवाटप
रायगड जिल्ह्याकरिता ध्वजदिन निधी -२०१७ संकलनाकरिता ६० लाख ९८ हजार ४०० रु पयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच या संकलित ध्वजदिन निधीमधून युद्ध विधवा, अपंग सैनिक, आजी-माजी सैनिक व त्यांच्या विधवांना तसेच अवलंबितांना सैनिक कल्याण विभाग व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाºया कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ प्र. जाधव यांनी सांगितले. सन २०१७-१७ या वर्षात जिल्ह्याच्या कल्याणकारी निधीमधून, वैद्यकीय, शैक्षणिक, चरितार्थ, अंत्यविधी, मुलीचे लग्न या कारणांस्तव जिल्ह्यातील ३२६ लाभार्थींना एकूण १६ लाख ९० हजार १२२ रु पये, तसेच दुसºया महायुद्धामधील २३० लाभार्थ्यांना प्रतिमाह तीन हजार रु पये याप्रमाणे एकूण ८३ लाख २४ हजार रु पये इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे.