कर्जतमध्ये कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; आरोग्य कर्मचाऱ्यांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 12:43 AM2021-01-26T00:43:35+5:302021-01-26T00:43:45+5:30
तालुक्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या टप्प्यात केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस दिली जाणार आहे.
कर्जत : केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे २५ जानेवारी रोजी शासकीय उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी कोविशिल्ड लसीकरण केंद्राचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते फीत कापून आणि कशेळे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रांत खंदाडे यांना प्रथम लस टोचून कोविशिल्ड लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.
तालुक्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या टप्प्यात केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. तालुक्यात कोविशिल्ड लसीकरण मोहिमेसाठी एक हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर एक महिन्यानंतर त्याच व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशिल्ड लस आपल्याकडे आली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी सांगितले. आज १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.
या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी बालाजी पुरी, साहाय्यक गटविकास अधिकारी, सी.एम. राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी.के. मोरे, वैद्यकीय अधिकारी नरहरी फड, डॉ. आकाश गोरे, डॉ. वसंत भालशंकर, डॉ. गणेश मेंगाळ, डॉ. अक्षय पर्जणे, नगरसेवक संकेत भासे, शिवसेना युवा नेते पंकज पाटील, जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सीरमची लस
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. कोविड केंद्रातील अधिपरिचारिका मनीषा बागुल यांनी डॉ. विक्रात खंदाडे यांना ही लस टोचली, त्यांच्या सहकारी म्हणून सारिका मोकल, रेश्मा बाबरे, अविशा मालकर आणि योगिता पाटील काम करीत आहेत. सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशिल्ड लस आपल्याकडे आली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी सांगितले.