मुरुडमध्ये ‘सागरी सुरक्षा कवच’ अभियानाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:32 AM2021-01-13T02:32:20+5:302021-01-13T02:32:37+5:30
पोलीस सज्ज; शिघ्रे चेक पोस्ट, आगरदांडा, राजपुरी, काशीद, मुरुड किनाऱ्यावर बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम काबंळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सागर कवच अभियानाला’ सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली.
मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले होते. पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेवर जास्त लक्ष दिले जाते. सहा महिन्यांनी जिल्हा पोलीस दलाकडून सागरी कवच अभियान राबविण्यात येते. यंत्रणामधील सुसंवाद, सावधानता तसेच सज्जता अशा तीन महत्त्वाच्या बाबींवर आधारित या ऑपरेशनमध्ये नौदल, कोस्ट-गार्ड, मेरीटाइम बोर्ड, यांचा सहभाग होता.
मुरूड पोलीस ठाण्याकडून सागरी हद्दीत गस्त करण्याकरिता सागरी सुरक्षा शाखेचे ६ अधिकारी, ५६ अंमलदार, या अभियानात सहभागी झाले होते.
पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी तपासणी व टेहळणी केली जाते. यामध्ये शिघ्रे चेक पोस्ट, आगरदांडा, राजपुरी, काशीद, मुरूड आदी ठिकाणांसह समुद्र किनाऱ्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
लाभदायक अभियान
वाहनांची तपासणी करून त्याची नोंद घेणे सागरी मच्छीमारीमधील बोटी तपासून परवाने व कागदपत्राची माहिती घेऊन नौका आपल्याच भागातील आहे किंवा कसे याची खात्री करून घेणे. वाहनांच्या तपासणीद्वारे सजगता बाळगून अतिरेकी कार्यवाही अथवा स्फोटक गती विधेयकाला रोखणे अशा गोष्टी रोखण्यासाठी लाभदायक.
सागरी किऱ्यावरील मच्छीमारांना संशयस्पद बोट आढळून आल्यास अथवा वाहनातून गैर वाहतूक अथवा देश विघातक कार्यवाहीची संशय येताच तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. सागरी सुरक्षा महत्त्वाची असून नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
-परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, मुरूड