सोगाव येथील बालग्राममध्ये ‘नो चाइल्ड अलोन’ मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:11 AM2019-05-18T00:11:34+5:302019-05-18T00:12:16+5:30
सन १९६४ मध्ये निराधार मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या एसओएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने १५ मे या आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनानिमित्त ‘नो चाइल्ड अलोन’ या जागतिक मोहिमेचा शुभारंभ केला आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : सन १९६४ मध्ये निराधार मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या एसओएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने १५ मे या आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनानिमित्त ‘नो चाइल्ड अलोन’ या जागतिक मोहिमेचा शुभारंभ केला आहे. भारतातील एसओएस इंडिया या संस्थेच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे कार्यरत एसओएस बालग्रामच्या वतीने देखील ‘नो चाइल्ड अलोन’ या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला.
भारतातील निराधार पालकहीन मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्याची नितांत गरज आहे. काळाची गरज म्हणून एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेने ‘नो चाइल्ड अलोन’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेचे सजिण अनुजा बन्सल यांनी केले आहे.
भारतातील दोन कोटी निराधार मुलांच्या अडचणी जगासमोर आणण्यासाठी व एसओएसमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा यासाठी ही मोहीम समर्पित आहे. या २ कोटी मुलांची पुरेशी काळजी घेतली जात नाही. कारण त्यांनी आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत किंवा पालक या मुलांचे पालन पोषण करण्यास सक्षम नाहीत. अशा कुटुंबाचे सक्षमीकरण नाही झाले आणि या मुलांना पुरेशी काळजी किंवा देखभाल सेवा मिळाली नाही तर ही संख्या २०२१ पर्यंत ४ कोटी एवढ्या भयंकर प्रमाणात वाढण्याची शक्यता विचारात घेऊन ‘नो चाइल्ड अलोन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
एसओएस सध्या ४४० कुटुंबे तसेच २६ हजार मुलांसाठी संस्थेच्या कौटुंबिक वातावरणात मुलांची काळजी कार्यक्र म व कुटुंब सक्षमीकरण कार्यक्र माच्या माध्यमातून सेवा देत आहे. एसओएस बालग्राम सोगाव अलिबाग येथे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्यात येत आहे. ‘कुटुंब आणि पर्यावरण’ हा यावर्षीचा कुटुंब दिनाचा विषय आहे. या कार्यक्र माच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना मुलांचे आरोग्य, शिक्षण, मूल्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एसओएस संस्था पालकदिन, निराधार मुलांची काळजी व देखभाल यासाठी कार्यरत असल्याचे अनुजा बन्सल यांनी सांगीतले.
सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक
संयुक्त राष्ट्राच्या बालहक्क परिषदेनुसार मुलांच्या योग्य वाढीसाठी कुटुंब हेच उत्तम ठिकाण आहे. कुटुंबामध्येच मुलांना प्रेम, काळजी, संरक्षण मिळू शकते. भारतातील या निराधार पालकहीन मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्याची गरज आहे.
काळाची गरज म्हणून एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेने नो चाइल्ड अलोन ही मोहीम राबविली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ८५८६९९६६९९ या
क्र मांकावर मिसकॉल देऊन आपला सहभाग नागरिक नोंदवू शकतात.