रेवस बंदरातील लाँच सेवा ‘गाळा’त, प्रवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:06 AM2018-11-24T00:06:10+5:302018-11-24T00:06:37+5:30
मांडवा आणि रेवस ही रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात व्यस्त असणारी बंदरे आहेत. फरक इतकाच आहे की, मांडवा बंदरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य चाकरमानी प्रवास करताना दिसून येतात.
- आविष्कार देसाई
अलिबाग : मांडवा आणि रेवस ही रायगड जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात व्यस्त असणारी बंदरे आहेत. फरक इतकाच आहे की, मांडवा बंदरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक प्रवास करतात, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य चाकरमानी प्रवास करताना दिसून येतात. मेरीटाइम बोर्डाने बंदरातील गाळ काढताना रेवस बंदराकडे दुर्लक्ष केल्याने येथील लाँच सेवेच्या वेळापत्रकावर आहोटीमुळे विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे या बंदरातून प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मांडवा बंदरातून थेट गेट वे आॅफ इंडिया (मुंबई) अगदी कमी वेळेत जाता येते. काही वर्षांत बंदराचा झपाट्याने विकास झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खासगी लाँच सेवा देणाºया संस्था उभ्या राहिल्या आहेत. आरामदायी प्रवासाबरोबरच सुरक्षित प्रवासामुळे या ठिकाणाहून प्रवासी बोटींच्या नियमित फेºया होत असतात. बोट सेवा देणाºया खासगी कंपन्यांना आणि मेरीटाइम बोर्डाला त्यामुळे चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. या बंदराची चांगल्या पद्धतीने देखभाल केली जाते. ओहोटीमुळे बोटसेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी बंदरातील गाळ काढण्याचे काम नियमित केले जाते. २०१७-१८ या कालावधीत मे. रॉक अॅण्ड रिफ ड्रेजिंग प्रा. लि. कंपनीने एक लाख ७२ हजार ५५७ घनमीटर गाळ काढला होता, तर २०१८-१९ या कालावधीमध्ये दोन लाख ५१ हजार ५५२ घनमीटर गाळ मे. रॉक अॅण्ड रिफ ड्रेजिंग प्रा. लि. या खासगी कंपनीनेच काढला आहे. यासाठी अनुक्रमे सहा कोटी ७२ लाख ९७ हजार २३० आणि नऊ कोटी ८१ लाख पाच हजार २८० असा एकूण १६ कोटी ५४ लाख दोन हजार ५१० रुपये खर्च करण्यात आला आहे. मांडवा येथील बंदरातून मोठ्या प्रमाणात नियमित गाळ काढला जात असल्याचे दिसून येते.
रेवसला सर्वसामान्य नागरिकांची पसंती
रेवस बंदरातून सर्वसामान्य प्रवासी प्रवास करतात, तर मांडवा बंदरातून आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे प्रवास करतात. या बंदरातील गाळ काढण्याचे काम मेरीटाइम बोर्ड चोखपणे बजावताना दिसते. मात्र, रेवस बंदराबाबत उदासीनता दिसून येते.
रेवस बंदरातील गाळ वेळेवर काढला जात नसल्यामुळे सद्यस्थितीतील तेथील लाँच सेवेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. रेवस बंदरावर मुंबई जलवाहतूक व औद्योगिक संस्थेच्या सूचनाफलकाखाली २२ नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबरपर्यंत ओहोटीच्या समस्येमुळे बदललेले वेळापत्रक लिहिले आहे. या वेळापत्रकामुळे प्रवाशांचेही वेळापत्रक कोलमडले आहे.
ओहोटीच्या वेळी प्रवासात अडचणी
रेवस बंदरातून मुंबई आणि करंजा असा जलप्रवास सुरू असतो. १ जून ते ३१ सप्टेंबरपर्यंत रेवस-मुंबई जलप्रवास पावसाळी हंगामामुळे बंद ठेवण्यात येतो. तर करंजा ते रेवस हा जलप्रवास कमी अंतराचा असल्याने वर्षाचे बाराही महिने सुरू असतो. रेवस आणि करंजा बंदरात गाळाची समस्या असल्याने संकष्टी चतुर्थीसह अन्य तिथीला ओहोटीच्या वेळी प्रवासात फार मोठा अडथळा निर्माण होतो. महिनाभर मेरीटाइम बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली रेवस बंदरात गाळ काढण्याचे काम सुरू आहे; पण गाळाची समस्या कायमस्वरूपी सुटत नाही.
मांडवा बंदरातील गाळ काढण्याकरिता खासगी ठेकेदारासाठी सुमारे साडेसोळा कोटी रुपये सरकारने उधळले आहेत. त्याची चौकशीची मागणी राज्याच्या गृहविभागाकडे केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मांडवा बंदरातून प्रवास करणारे हे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तर रेवस बंदरातून सर्वसामान्य प्रवास करतात. त्यामुळे मेरीटाइम बोर्ड या बंदराकडे दुर्लक्ष करत आहे. मेरीटाइम बोर्डाने हा दुजाभाव बंद करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
११ हजार २५० घनमीटर गाळ काढला
रेवस बंदराचा विचार केल्यास एप्रिल-मार्च २०१७ त्यानंतर १५ आॅक्टोबर २०१८ पासून आतापर्यंत सुमारे ११ हजार २५० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. रेवस बंदरातील गाळ काढण्याचे काम मेरीटाइम बोर्डाकडून सुरू आहे, अशी माहिती मेरीटाइम बंदराचे बंदर निरीक्षक आशिष मानकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
मांडवा बंदरातून होणाºया प्रवासी वाहतुकीसाठी चांगल्या दर्जाच्या लाँच प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. लाँच सेवेचे तिकीटदर १५० रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत आहेत, तर रेवस ते भाऊचा धक्का (मुंबई) सुमारे ८० रुपये तिकीटदर आहे. हा दर मांडव्यापेक्षा खूपच कमी असल्याने सर्वसामान्य येथून मुंबईला जाणे पसंत करतात आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना ते परवडणारे आहे.