कशेडी घाट बोगद्याच्या कामाचा मे महिन्यात शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:46 AM2018-04-22T01:46:00+5:302018-04-22T01:46:00+5:30
सहा लेनचे दोन बोगदे; २०२०पर्यंत काम पूर्ण होणार
जयंत धुळप ।
अलिबाग : रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अपघातविरहित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाºया कशेडी घाट बोगद्याच्या कामाचा शुभारंभ मे महिन्यात करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने निविदेच्या माध्यमातून या कामासाठी ५०२.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सन २०२०पर्यंत या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली आहे. त्यामुळे हा घाट पार करण्यासाठी लागणाºया ४० मिनिटांचा कालावधी अवघ्या १० मिनिटांवर येणार आहे.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्याचा महत्त्वाचा दुवा असणाºया कशेडी घाट बोगद्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नुकतेच एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला रत्नागिरीची जिल्हाधिकारी प्रदीप पी., राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड, प्रांताधिकारी अमित शेडगे, खेडचे प्रांताधिकारी सोनावणे आणि कशेडी घाटाचे काम करणारे कंत्राटदारही उपस्थित होते.
कशेडी घाटातील अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यातच कशेडी घाटाचे ३४ कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. हा वेळ कमी करण्यासाठी तसेच गोवा महामार्गाने कोकणात जाणाºया प्रवाशांचा प्रवास अपघातविरहित करण्यासाठी कशेडी घाटातील बोगदा महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी संबंधित अधिकाºयांसोबत अनेक बैठका घेतल्या. केंद्र सरकारबरोबर पत्रव्यवहारही केला. त्यानुसार केंद्राच्या रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने निविदेच्या माध्यमातून या कामासाठी ५०२.२५ कोटी मंजूर केले आहेत.
मे महिन्यापासून या बोगद्याचे पाथमुख उघडण्याचे काम सुरू होईल. भोगांवपासून या कामास सुरुवात करण्यात येईल. कशेडी येथे पावणे दोन किलोमीटरचे दोन बोगदे तयार करण्यात येणार असून, जाण्यासाठी व येण्यासाठी प्रत्येकी तीन लेन ठेवण्यात येणार आहे. तसेच बोगद्यामध्ये लाइटची तसेच व्हेंटिलेशन व्यवस्था, बोगद्यात गाडीत बिघाड झाल्यास गाडी बाजूला उभी करण्यासाठी विशेष व्यवस्था, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तसेच साईन बोर्डही लावण्यात येणार आहेत. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावरही त्या रस्त्याच्या देखभालीचे काम चार वर्षे कंत्राटदारालाच करावे लागणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाºयांनी दिली.