खालापूर : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करणारा नवरा, सासू, सासरा, दीर व जाऊ यांना खालापूर न्यायालयाने तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. कविता ऊर्फ जागृती जगदिश ठोंबरे (२८,रा.टेंभरी,ता. खालापूर) हिने याबाबत खालापूर पोलिसांत सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती. याबाबतचा खटला खालापूर न्यायालयात सुरू होता. न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग एम. पी. सराफ यांनी हा निकाल दिला.कविता ऊर्फ जागृती हिचा विवाह जगदिश ठोंबरे यांच्याबरोबर झाला होता. लग्न झाल्यापासून जगदिश, त्यांची आई कुंदा ठोंबरे, वडील धर्मा ठोंबरे, जाऊबाई उषा ठोंबरे, दीर समीर व हरिश्चंद्र ठोंबरे हे कविताचा शारीरिक, मानसिक छळ करीत होते. लग्नाचा व मुलाच्या दवाखान्याचा झालेला खर्च ४ लाख ५० हजार रुपये माहेरहून घेऊन ये, असा तगादा सासरच्यांनी कविता हिच्या मागे लावला होता. कविता हिला लग्नाच्यावेळी दिलेले दागिनेही काढून घेण्यात आले होते. हा त्रास असह्य झाल्याने कविताने खालापूर पोलीस ठाण्यात तक्र ार केली होती. न्यायालयाने सर्व आरोपींना तीन वर्षे साधी कैद व ५ हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली, तर आरोपी जगदिश ठोंबरे याला दोन वर्षे साधी कैद पाच हजार दंड व दंड न भरल्यास तीन महिने कैदेची शिक्षा सुनावली. (वार्ताहर)
सासरच्यांना तीन वर्षांची शिक्षा
By admin | Published: October 31, 2015 12:10 AM