- वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : शेतकरी, कष्टकरी, कातकरी आणि आदिवासी हा घटक केंद्रस्थानी ठेवून ॲड. सुरेखा दळवी यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. श्रमिक क्रांती संघटनेच्या माध्यमातून समाज कार्याचा वसा सुरू ठेवला. संघटना व सामाजिक कामाची गरज म्हणून १९८३ साली वकिलीची सनद घेऊन पनवेलच्या कोर्टात वकिली सुरू केली. वकिलीचा उपयोग मुख्यत: आदिवासी, शेतकरी, ग्रामीण, गरीब, कष्टकरी व स्त्रियांचे हक्क संरक्षणासाठी दळवी यांनी केला. आधुनिक काळातील नवदुर्गेच्या रूपाने दळवींनी असंख्य शोषितांना न्याय मिळवून दिला.
सुरेखा दळवी यांचा जन्म आणि शिक्षण मुंबई उपनगरात झाले. माहेर व सासर दोन्ही राष्ट्र सेवादल व समाजवादी चळवळीशी जोडलेले. हाच वारसा त्यांनी चालू ठेवला. आणीबाणीनंतर १९८७ साली तेव्हाच्या कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील तारा येथील युसुफ मेहेरअली केंद्राशी जोडून राष्ट्र सेवा दलाच्या विद्यार्थी विभागाने सुरू केलेल्या आदिवासींच्या अनौपचारिक शिक्षण व आरोग्याशी संबंधित कामात सहभागी होऊन १९८७ ते १९९० या तीन वर्षांत पनवेल, पेण व उरण या तालुक्यांत आदिवासी वस्त्यांतून फिरताना जाणवलेले शोषण, अन्याय, अत्याचाराला तोंड देण्यासाठी १९९३ साली ‘ श्रमिक क्रांती संघटना’ स्थापन केली. सध्या संघटनेचे काम रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, खालापूर, सुधागड, रोहा व अलिबाग या सात तालुक्यांत आणि नवी मुंबई परिसरातील जवळपास ४०० हून अधिक वाड्या-वस्त्यांतील कष्टकऱ्यांत आहे. संघटनेचे ९ पूर्णवेळ स्थानिक कार्यकर्ते आहेत. कामाचे स्वरूप मुख्यतः प्रबोधन, प्रशिक्षण, संघटन, संघर्ष, रचना आणि अभ्यास संशोधन अशा विविध पातळ्यांवर सुरू आहे. राज्य व देश पातळीवरील समविचारी आघाड्या यांच्याशी जोडून संघटना नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत आणि विवेकी वापरावर भर देत आहेत.
२५ वर्षांचा लढाn आदिवासी कुटुंबे स्थिर व्हावीत म्हणून त्यांचे वन जमिनीवरील विशेषत: जमिनीवरचे हक्क मिळावेत म्हणून २५ वर्षे चिकाटीने लढा देऊन जवळपास १५ हजार एकर जमीन मुख्यत: आदिवासी कुटुंबांना मिळवून देण्याचे काम सुरू आहे. यासह आदिवासींवरील अन्यायाला दळवी यांनी वाचा फोडली. n यामध्ये आदिवासी, अल्प भूधारकांच्या जमिनींवर उभारण्यात येणाऱ्या महलमीरा व रामेश्वर वैभव हिल्स स्टेशन्स विरोधी लढा, रायगड जिल्ह्यातील ‘महामुंबई सेझ’विरोधी लढ्यातील सहभाग, आदिवासींचे स्थलांतर थांबावे म्हणून त्यांच्या जमिनीत फळझाडे व भाजीपाला लागवड करणारे गट तयार करणे, युवकांना जमीन मोजणी, बाळगंगा धरण प्रकल्प भ्रष्टाचार उघडकीस आणणे अशी असंख्य कामे आजघडीला त्या करीत आहेत.