रायगड जिल्ह्यात सर्वत्र लक्ष्मीपूजन उत्साहात, व्यापाऱ्यांनी केले चोपडीपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 03:32 AM2018-11-08T03:32:12+5:302018-11-08T03:32:43+5:30
आश्विन अमावास्या अर्थात लक्ष्मीपूजनाचा दिवस व्यावसायिक आणि घरोघरीदेखील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो, त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र लक्ष्मीपूजनाचा सोहळा उत्साहात होताना दिसून आला.
विशेष प्रतिनिधी
अलिबाग - आश्विन अमावास्या अर्थात लक्ष्मीपूजनाचा दिवस व्यावसायिक आणि घरोघरीदेखील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो, त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र लक्ष्मीपूजनाचा सोहळा उत्साहात होताना दिसून आला. सुवर्णकार, सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या पेढ्या, व्यावसायिक त्याचबरोबर सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये लक्ष्मीपूजन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.
चौरंग वा पाटावर कुंकुम अक्षतांच्या साहाय्याने आठ पाकळ्यांचे कमळ काढून त्यावर लक्ष्मी, विष्णू, कुबेर या देवतांची पूजा करण्यात आली. सुखसमृद्धी आणि आर्थिक वृद्धीकरिता मनोभावे प्रार्थना करून लवंग, वेलची, साखरयुक्त गाईच्या दुधापासून केलेल्या मिठायांबरोबरच धणे, गूळ, साळीच्या लाह्या, फळे, बत्तासे अशा विविध पदार्थांचाही नैवेद्य दाखविण्यात आला.
अमावास्येमुळे संपूर्ण जगामध्ये अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते; परंतु पणत्या आणि विविध दिव्यांच्या प्रकाशात तो अंधार दूर केला जातो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय-’ अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रगतीकडे, आशेकडे, यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा या आश्विन अमावास्येच्या रात्री लखलखणाºया असंख्य पणत्यांकडून मिळत असते. लक्ष्मीपूजनासारख्या धार्मिक विधींचे प्रत्येक जण आपापल्या परीने भक्तिपूर्वक पूजन करतो.
व्यापारी पूजेनंतर पुढील वर्षाच्या जमाखर्चाच्या वह्यांची पूजादेखील याच दिवशी करतात. या परंपरेस अनुसरून अलिबाग, पोयनाड, महाड, रोहा, माणगांव, पेण येथील मोठ्या व्यापाºयांनी संध्याकाळी मुहूर्तावर ‘चोपडीपूजन’ केले. वर्षभरातील अमावास्या कुठल्याही शुभकार्यासाठी अयोग्य मानल्या जातात. मात्र, आश्विन अमावास्या त्यास केवळ अपवादच असते. ही अमावास्या सर्वाधिक पवित्र आणि आर्थिकदृष्ट्या लाभकारी मानली जाते.
रेवदंड्यात बाजारपेठेत रोषणाई
लक्ष्मीपूजन सायंकाळी ४.३० ते रात्री ११ च्या सुमारास असल्याने व्यापारीवर्गाप्रमाणे घरोघरी लक्ष्मीचा फोटो, नवीन वहीवर स्वस्तिक काढून पूजनासाठी तयारी चालू होती. सकाळपासूनच पुरोहितवर्गाकडे अनेक व्यावसायिक पूजनाचा मुहूर्त ठरवण्यासाठी आलेले दिसत होते.
सायंकाळी बाजारपेठेत दिव्यांची रोषणाईने सजली होती. काही व्यापारी मात्र वही (चोपडी)पूजन ऐवजी आधुनिक लॅपटॉप किंवा संगणकाची पूजा करताना दिसत होते. काही ठिकाणी धणे-गुळाचा नैवेद्य दाखवला जात होता, तर काही ठिकाणी बतासे प्रसादात होते.