उन्हाच्या काहिलीने पक्ष्यांची दाणा-पाण्यासाठी वणवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 01:29 AM2021-03-10T01:29:58+5:302021-03-10T01:30:26+5:30
तापमानाचा पारा वाढल्याने सारेच त्रस्त
विनोद भोईर
लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. या वाढत्या तापमानाचा फटका पक्ष्यांना जास्त बसत आहे. त्यांची दाणा-पाण्यासाठी दाही दिशा वणवण होत आहे. यासाठी पक्षी मानवी वस्तीतदेखील येत आहेत. भूक-आणि पाण्यावाचून तसेच यातून येणाऱ्या तणावातून पक्ष्यांचे मृत्यू होण्याची शक्यता पक्षी अभ्यासक व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
विळे पाटणूस भागात नुकत्याच अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. पाण्यासाठी वणवण फिरत असताना पिवळ्या डोळ्याचा सातभाई नावाचा पक्षी भरदुपारी वाहनांच्या धडकेने जखमी झालेला अभ्यासक राम मुंढे यांना आढळला. त्यानंतर हा पक्षी दगावला. त्याचदिवशी भीरा येथील संकेत देवरुखकर यांच्या घराच्या अंगणात घारीचे एक मोठे पिलू निपचित बसले होते. त्यांनी मुंढे यांना याबाबत माहिती देऊन त्यांना बोलावून घेतले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे आणि वाढत्या तापमानामुळे या पिलाच्या शरीरातील पाणी कमी झाले आणि त्या पिलाला त्रास होऊ लागल्यामुळे ते अंगणात येऊन बसले होते, असे मुंढे यांनी सांगितले. त्यानंतर देवरुखकर यांनी त्या पिलाच्या अंगावर पाणी टाकले, तसे ते थोडे सावध झाले आणि उठून समोरच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसले आणि आपल्या पंखांना पसरवून ते हालचाल करू लागले.
पाणी पिऊन तासाभराने तेथून निघून गेले. यासंदर्भात राम मुंढे यांनी माणगाव वनविभागाशीदेखील संपर्क केला. आपल्या भागात अशा घटना घडत असतील, तर माणगाव वनविभाग यासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन वनरक्षक अमोल निकम यांनी दिले.
ऊन वाढू लागल्याने पशु-पक्ष्यांची पाणी आणि अन्नासाठी भटकंती वाढते. तसेच सावलीचीदेखील आवश्यकता लागते. हे मिळविण्याच्या खटाटोपात पक्षी तणावात (स्ट्रेस) जातात आणि त्यांचा मृत्यू होेतो. लोकांनी आपल्या घराच्या छपरावर, अंगणात किंवा झाडावर थोड्या पाण्याची व दाण्याची थोडी व्यवस्था केली, तरी या पक्ष्यांचा जीव वाचू शकतो. तसेच जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाण्याचे स्रोत व पाणवठयामध्ये पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.
- डॉ. प्रशांत कोकरे, पशुधन विकास अधिकारी, सुधागड
सध्या घारीची पिलं घरट्यातून बाहेर पडतात. आधीच उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात त्यांचे घरट्याच्या बाहेर पडणे त्यामुळे ते विचलित होतात आणि अशातच या पिलाला उन्हाचा त्रास व पाणी न मिळाल्याने ते जास्त बिथरले होते. असेच इतरही पक्ष्यांच्या बाबतीत घडते.
- राम मुंढे
पाटणूस येथे देवरुखकर यांच्या घराच्या अंगणात अन्न-पाण्याच्या शोधात आलेली घार. (छाया : विनोद भोईर)