सभापतीपदासाठी आघाडीचा दावा

By admin | Published: March 8, 2017 04:31 AM2017-03-08T04:31:18+5:302017-03-08T04:31:18+5:30

पंचायत समिती सभापतीपदासाठी १४ मार्चला निवडणूक होत असून, आठपैकी पाच जागी आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे आघाडीचा सभापती होणार आहे.

Leader of the House for the post of Speaker | सभापतीपदासाठी आघाडीचा दावा

सभापतीपदासाठी आघाडीचा दावा

Next

वावोशी : पंचायत समिती सभापतीपदासाठी १४ मार्चला निवडणूक होत असून, आठपैकी पाच जागी आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे आघाडीचा सभापती होणार आहे.
खालापूर पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण महिला वर्गाकरिता आरक्षित असून, आघाडीच्या पाच विजयी उमेदवारांमध्ये तीन महिला आहेत. आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाकडे वासांबे गणातून माजी सभापती सुरेश म्हात्रे यांच्या मुलीचा पराभव करत शिवसेनेची मक्तेदारी मोडून विजयी झालेल्या वृषाली पाटील या सभापतीपदासाठी दावेदार असून, काँग्रेसकडे चांभार्ली गणातून विजयी झालेल्या कांचन पारंगे या सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. तर सभापतीपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या साजगाव पंचायत समिती गणातून विजयी झालेल्या श्रद्धा साखरे असल्याचे मानले जात असून सुरुवातीला राष्ट्रवादीला संधी मिळण्याची शक्यता आहे.
खालापूर तालुक्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आला असून, शेकापच्या वृषाली पाटील आणि काँग्रेसच्या कांचन पारंगे यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सध्या खालापुरात मोठ्या भावाच्या भूमिकेत असून, पहिला सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बसावा, यासाठी सर्व फिल्डिंग लावण्यात आली आहे. काँग्रेस पक्षांकडून कांचन पारंगे यांना पहिला सभापतीपदाचा मान मिळावा, यासाठी हालचाली सुरू होत्या; परंतु शेतकरी कामगार पक्षातील दोन उमेदवारांनी आणि शेकापच्या तालुक्यातील नेतृत्वाने राष्ट्रवादीला पसंती दिल्यामुळे काँग्रेसला थोडे थांबावे लागणार
आहे. २५ वर्षांनी सत्तेबाहेर विरोधी बाकावर बसावे लागणार यामुळे शिवसेनेकडून अंतर्गत हालचाली सुरू होत्या. आघाडीत बिघाडी करून किमान उपसभापतीपद शिवसेनेच्या पदरात पाडून घ्यावे, अशी रणनीती आखण्यात येत होती; परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने घडामोडी थंडावल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्षांत दुसऱ्यांदा सभापतीपदाचा मान मिळणार असून, २०१२मध्ये शिवसेनेची सत्ता येऊनसुद्धा सभापतीपदासाठी आरक्षित जागेवर शिवसेनेचा पराजय झाल्यामुळे केवळ दोन जागा असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या लता पवार यांनी अडीच वर्षे सभापतीपद भोगले. २०१२मध्ये नशिबाने, तर या वेळी मतदारांनी साथ दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे खालापूर पंचायत समिती सभापती येणार असून श्रद्धा अंकित साखरे यांच्या रूपाने पुन्हा एकदा महिलेला संधी मिळणार आहे. (वार्ताहर)

१४ मार्चला महाड पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक
- महाड पंचायत समितीवर १० पैकी ९ जागांवर निर्विवाद यश मिळवल्यानंतर सभापतीपदासाठी शिवसेनेत जोरदार स्पर्धा निर्माण झालेली असून, माजी सभापती सदानंद मांडवकर यांच्यासह विद्यमान सभापती दीप्ती फळसकर यांचे पती दत्ताराम फळसकर व सीताराम कदम हे तिघे जण दावेदार मानले जात आहेत. मात्र सदानंद मांडवकर हे अनुभवी व अभ्यासू सदस्य असल्याने सभापतीपदाची माळ मांडवकर यांच्याच गळ्यात पडणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे.
- पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदासाठी येत्या १४ मार्च रोजी निवडणूक होत असून सकाळी ११ ते दुपारी १ वा. पर्यंत या पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीच्या सूत्राकडून माहिती देण्यात आली आहे. १४ मार्च रोजी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्या उपस्थितीत सभापती, उपसभापतीपदासाठी निवडीची प्रक्रिया पार पडली जाणार आहे.
- शिवसेनेत तीनहून अधिक सदस्य सभापतीपदासाठी इच्छुक असले तरी शिवसेनेतच निर्विवाद वर्चस्व असल्याने या दोन्ही पक्षांच्या निवडी बिनविरोध होणार हे स्पष्ट आहे.
आ. भरत गोगावले या तिघांपैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत अपर्णा येरुणकर या काँग्रेसच्या सदस्य निवडून आलेल्या आहेत.

Web Title: Leader of the House for the post of Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.