विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:59 PM2019-09-16T23:59:07+5:302019-09-17T00:00:10+5:30

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. आमदार व इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

Leader mobilization in the face of the Legislative Assembly | विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची मोर्चेबांधणी

विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची मोर्चेबांधणी

Next

- विनोद भोईर / संजय करडे 
पाली : विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. आमदार व इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मतांची चाचपणी सुरू आहे. गाव बैठकांना उधाण आले आहे. नारळफोडीचे (कामांचे) कार्यक्रमही वाढले आहेत. आउटगोर्इंग, इनकमिंगही जोरात आहेत. मात्र तसे करताना, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलले जाणार नाही, त्यांचा रोष नको यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. एकंदरीत सर्वच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची धावपळ वाढली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांत अलिबागचे आमदार पंडित पाटील, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे, उरणचे आमदार मनोहर भोईर, कर्जतचे आमदार सुरेश लाड आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय भवितव्य पटावर लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्याआधी सर्वच प्रस्थापित आमदार विविध योजना, रस्ते, समाज मंदिरे यांची उद्घाटने करत आहेत. समाज मंदिरे बांधण्यावर सर्वच मतदारसंघात धडाका पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यात्या समाजातील लोकांची एकगठ्ठा मते मिळण्याचा फायदा असतो.
याबरोबरच गावागावातील हरिनाम सप्ताह, पूजा, प्रतिष्ठित व मोठ्या व्यक्तींचे वाढदिवस, क्रीडा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांत नेतेमंडळी आवर्जून हजेरी लावताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाट देखील असतो. तसेच नेतेमंडळी स्वत:चे वाढदिवस देखील मोठ्या थाटामाटात साजरे करत आहेत. गाव पातळीवर विविध उपक्रम व स्पर्धा ठेवून त्यामध्ये मोठी बक्षिसे दिली जात आहेत. कोणत्या ना कोणत्या मार्गांनी लोकांपर्यंत आपण व आपला चेहरा पोहचावा असे प्रत्येक संभाव्य उमेदवाराला वाटत आहे. आपल्या मतदार संघातील मुंबई, पुणे, गुजरात, ठाणे अशा विविध शहरांत कामानिमित्त गेलेल्या मतदारांवर देखील उमेदवार लक्ष ठेवून आहेत.
केंद्र, राज्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या माध्यमातून विकास निधी आणून विकासकामे पूर्ण केली जात आहेत आणि ती आम्हीच म्हणजे आमच्या पक्षाने आणि नेत्यांनी कशी आणली? हे दाखविले जात आहे. बहुतेक सर्वच पक्षातील मोठे नेते आता लोकांमध्ये फिरताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. तर श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे व त्यांचे वडील माजी आमदार अनिल तटकरे यांनी शिवसेनेचे शिवधनुष्य उचललेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा मुख्य संघटक अनुपम कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे कमळ हातात घेतले आहे. पालीचे अपक्ष सरपंच गणेश बाळके यांनी तसेच भारिपचे नेते मंगेश वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वी शेकापचा लाल बावटा खांद्यावर घेतला.
अशाप्रकारे सर्वच पक्षात इनकमिंग आणि आउटगोर्इंगचे सत्र सुरू आहे. आणखी काही दिवसांत तर याला अधिक वेग येईल. या सर्व उहापोहात सामान्य जनतेचे प्रश्न, अडचणी आणि समस्या यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसते आहे.
>विविध विकासकामांच्या भूमिपूजनाला वेग
मुरूड : लवकरच विधानसभा निवडणूक संपन्न होणार आहेत. त्यासाठी विविध राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. काही दिवसांच्या अंतरावर आचारसंहिता लागणार आहे.त्यामुळे ज्यांच्याकडे सत्ता होती ते आता विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कामात गुंतलेले दिसून येत आहेत.पाच वर्षाची सत्ता उपभोगल्यावर काही कामाचा ज्यांना विसर पडला होता आता ती कामे पूर्ण करण्याचा घाट घातला जात आहे. मते आपल्या पारड्यात खेचून घेण्यासाठी विविध विकासकामाचे संपूर्ण दिवसाचे कार्यक्रम मोठ्या जोरात सुरु करण्यात आले आहेत. आचारसंहिता लागण्याअगोदर पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन करणे तर काही कामाचे भूमिपूजन करून ती तशीच भिजत ठेवणे अशा कल्पकता काहीजण वापरून जनतेला खूश करण्यासाठी मोठी धावपळ सुरु असल्याचे चित्र सध्या अलिबाग -मुरुड विधानसभा मतदार संघात सुरु असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांनी आचारसंहिता लागणार असून तातडीने कामे पूर्ण करून निवडणुकांना सामोरे जाऊन आम्ही हे केले आम्ही ते केले अशा प्रचारात फुशारकी मारण्यासाठी काही पक्षाचे कार्यकर्ते मोठे गर्क झाल्याचे दिसून येत आहे. पाच वर्षे असताना काही कामाचा विसर पडला होता, परंतु तीच दुर्लक्षित केलेली कामे आता पूर्ण करण्याचा घाट घातला जात आहे.काही पक्ष भूमिपूजनाच्या गर्क आहेत तर काही पक्ष कार्यकर्त्यांच्या सभा घेण्यात व्यस्त आहेत,त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा मोठा फायदा घेऊन प्रत्येक कार्यकर्ता पक्षीय कामात मोठा व्यस्त झालेला दिसून येत आहे. लोकांची भलामण करून पाठिंबा मिळवणे व तर आमच्या पक्षात या आम्ही तुमचे काम निश्चित करून देऊन पक्ष प्रवेशसारखे कार्यक्रम जोरात सुरु आहेत.

Web Title: Leader mobilization in the face of the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.